बरसणारया त्या क्षणासाठी
होती जितुकी ती व्याकुळली
सलज्ज रातीचा लेवून नजराणा
ती श्रावणवेळ आली....
तारकांचे मंद दिवे
सजविती तोरण गवाक्षी
मुग्ध हळवे प्रणयीस्वर
गातात सांजपक्षी
अल्लड तो श्रावण बघ ना
धरणीशी गुज खेळतो
मिलनातुर दोन जीवांचा
कसा अंत पाहू बघतो
उरात अजुनी अनाम धडधड
सर्वांगी गोड शिरशिरी
खट्याळ हासू खेळवीत गाली
उभा प्रियतम कसा शेजारी
नकळत मिटत जाती
दोघांमधली अंतरे
स्पर्शाच्या लाघवी जादूत
कोणा कुठले देहभान नुरे
नवख्या नवथर क्षणाची
अंग अंग मखमली साय
अबोल रातराणी कोवळी
रात्र रात्र खुलत जाय
केतकी देहावर झूलते
रोमांचाचे गोंदण
नितळनिळ्या अस्मानी
श्वासांतिल सुगंधी पखरण
ओला श्रावण ठेवुनी जातो
पानोपानी अपुला ठसा
तृप्त भिजल्या रातीचा
घेतो निरोप पहाट कवडसा
सुखाची काढावी दृष्ट म्हणोनी
किंचित ओलावते तिची पापणी
वेडयाच आपल्या राणीची
करतो राजा गोड मनधरणी
धुंद सहवासाचे गुपित
ऐक वारा सांगतो काही
श्रावण इथे विरघळला
हा क्षण दुसरा नाही
हा क्षण दुसरा नाही..!
~~~~जुई~~~~