पाऊस

घनघोर असा पाऊस येऊ दे आता
बहुवार फसविती मेघ वल्गना गाता        धृ.

हे मळभ कसे आले येथ दाटून
जल येइल वाटे मेघ सर्व साठून
संपून प्रतीक्षा घन वर्षो ओलेता
घनघोर असा पाऊस येऊ दे आता            १

ही धरा तापली छिन्नदेह होऊन
जलस्रोत आटले दग्धकाय राहून
जलप्राणमयी प्रसन्न हो वरदाता
घनघोर असा पाऊस येऊ दे आता            २

घे रुद्रवेष कर आसमंत आनंदी
वर्षाव करी दे जलधारा स्वच्छंदी
रे गंध तुझा नभी जाई मन भिजता
घनघोर असा पाऊस येऊ दे आता            ३

विनवणी पोचली, थेंब 'जिणे' होऊन
देहात प्रगटले अवनीशी लगटून
कळी फुलली, देही शिरशिरली पूर्णता
घनघोर असा पाऊस येऊ दे आता            ४