अभ्यास अन तयारी सारे उगीच आहे
जी जी निघेल इच्छा ती वेगळीच आहे
ओळीस दाद दे तू गंधीत मोहराची
असलो कसा तरीही मीही कवीच आहे
इर्शाद बोलणारे वा वा म्हणून गेले
गर्दी नवीन होती, घटना जुनीच आहे
भेटू पुन्हा तुला तो मुद्दा कळेल तेव्हा
सध्या तुझ्यामते मी काहीतरीच आहे
आता विचार येतो, होतो निराश, जातो
संधी सुधारण्याची गेली कधीच आहे
चोरून पाहताना चोरून पाहतो मी
मीही तसाच आहे तीही तशीच आहे
कृत्यास लेखणी मी ना मानले कधीही
आयुष्य आज कळले 'मोठी वहीच' आहे