अजूनही पुकारतो, अजून काय पाहिजे?
मरून हाक मारतो, अजून काय पाहिजे?
असे तुला मधेच त्यागणे कधी जमेल का?
हळू हळू सुधारतो, अजून काय पाहिजे?
तुझ्यासमीपची हवा मनास ओल आणते
तरी कुठे तरारतो, अजून काय पाहिजे?
सबंध काळ आठवून मांडतो समोर मी
मलाच मी विचारतो, अजून काय पाहिजे?
रडू नकोस जीवना नसे जिवंत पाहुनी
तुझाच ना करार तो, अजून काय पाहिजे?