हे मन चल तू क्षितिजी रे
आकाश मिळे सागरा जिथे ॥
नंदनवन जरी फुललेले
भ्रमर थवे रुंजिती तिथे ॥
मूक रुदन मृदू सुमनांचे
डंख साहती असहाय्यते ॥
राजमहाली सुख ओथंबे
खरेच का? मज ना पटते ॥
भय सेवेला अधिकाराचे
श्वासा ना मोकळीक मिळे ॥
चार दिशांना वई भिंतींचे
छपराखाली जीव घुसमटे ॥
पिंजऱ्यातला पक्षी चिवचिवे
गुलामगिरीचा पाश तिथे ॥