आलास काय गेलास काय सारी मजाच आहे
प्राणा तुला कसे वाटले जणू मी खराच आहे?
अंतीम मीलनाची घडी जणू लांबणार आहे
आलिंगनात तीही उगाच मीही उगाच आहे
काही नकोस चिंता करू, जसा तू तसा कुठे मी?
केला सराव गर्जायचा तरी मी ससाच आहे
अंदाज येत नाही कधीच वागायचे कसे हा
प्रत्येक माणसाच्यानुसार मी वेगळाच आहे
भेटायचो तुला ते ठिकाण बदलून खूप गेले
युगुले नवीन आहेत पण शिरस्ता तसाच आहे
मागे पुन्हा वळालो कशामुळे तो प्रसंग ऐका
गेलो कशास होतो नका विचारू, कथाच आहे
गुंतायची व सोडायची मला धाडसेच नव्हती
होता तुझा जसा तो तसाच हाही दगाच आहे