सर्वांच्या माहितीसाठी..

सहज मॅजेस्टिकमध्ये एक पुस्तक आणायला म्हणून गेले असताना एक संच दिसला. प्लाझाजवळचे मॅजेस्टिक बरं का, शिवाजीमंदिरातले नव्हे.

त्या संचात " मनोरंजनाचा दिवाळीचा अंक (१९०९), मौज दिवाळी अंक १९२४", "सत्यकथा नोव्हेंबर १९३३", " सोबत - वर्ष पहिले, अंक पहिला, मे १९६६", "केसरी वर्ष १, अंक १, जानेवारी १८८१"; आणि "मराठा वर्ष १ ले, अंक १ ला, नोव्हेंबर १९५६ " ही मासिके व वृत्तपत्रे आहेत, अर्थातच झेरॉक्स प्रती.

संचाची किंमत अंमळ जास्त म्हणजे रुपये २५० आहे, पण संदर्भ मूल्य, उत्सुकता अन उपलब्धतता या गोष्टी लक्षात घेता ठीकच म्हणावी लागेल.

मनोरंजनाचा अंक चांगलाच जाडजूड आहे. किंमत १ रुपया, म्हणजे त्या काळी सुद्धा बरीच आहे असे वाटले. श्री काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी प्रकाशित केला आहे. पान उघडता उघडताच "लोटस साबू" अन " अजब ऐने महाल" व "नवीन बहारदानीष" या दोन पुस्तकांच्या जाहिराती दिसतात. अंक एकूणातच असंख्य जाहिरातींनी भरलेला आहे. पुस्तके, स्वदेशी माल, ज्वरबिंदू, नाटकी सामान, लग्नाची स्थळे, शहाबादी लादी, डोंगरे बालामृत, विमा, बँका, शिवणयंत्रे एवढेच नव्हे तर मोजे, गंजिफ्राक घरबसल्या करण्याचे यंत्र अशा अनंत जाहिराती बघून गंमत वाटते. भाषा अन लिखाणाची पद्धत सोडली तर वस्तूत काही फारसा फरक नाहीच. पूर्वी कधीतरी जुन्या पुस्तकात वाचलेला शब्द "सारसापरिला" म्हणजे काय ते जाहिरात बघून आज कळले. भरपूर जाहिरातीनंतर मग विषय अन चित्रे यांचा अनुक्रम आहे, तो ही अगदी चार पानी. जवळ जवळ दोनशे पानी अंक असून चार छापखान्यात छापलेला आहे.

लेखकांत ( कविता वगैरे धरून ) सौ लक्ष्मीबाई टिळक, न्या. नारायण गणेश चंदावरकर, ना. गोपाळ कृष्ण गोखले, श्री श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, श्री विठ्ठल रामजी शिंदे, श्री त्र्यंबक बापूजी ठोंबरे, श्री रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, श्री धर्मानंद कोसंबी अशी कित्येक नावे आहेत. ही फक्त नमुन्यादाखल इथे नमूद केली आहेत. लेखनाच्या प्रत्येक पानाभोवती चौकट असून त्याखाली परत छोटया चौकटीत जाहिराती ( थोडक्यात केबल टी वी वरील सिनेमातील खालचा अर्धा भाग आठवा ).

अनेक पान भरून चित्रे, त्यात स्वतः श्री काशिनाथ मित्रांपासून सुरुवात करून, हिंदुस्थानचा सार्वभौम बादशाह सप्तम एडवर्ड, गायकवाड महाराज घराण्यातले लोक, वर निर्देश केलेले अनेक लेखक असे खूप फोटो आहेत. काही ग्रंथकारांचेही फोटो आहेत. फर्ग्युसन मधले प्रोफेसर्स, मुंबईतले प्रसिद्ध वकील, डाक्टर ( असेच लिहिले आहे तिथे ) ग्रंथप्रकाशक, नट आदीचेंही फोटो आहेत. मान्यवरांचे लेख मात्र वाचनीय आहेत. "वधूंची अदलाबदल" ( लेखक श्री विठ्ठल गुर्जर ) असे एक प्रहसनही आहे. श्री ना वा टिळकांची "सृष्टीची भाऊबीज" ही "lyric" व "sonnet" या प्रकरातली आहे असे त्यांनी लिहिले आहे आणि त्याला "वीणा" व " चतुर्दशक" असे नाव दिले आहे.

विषयांचा आढावा घ्यायचा म्हटला तर राष्ट्र, गणित, इतिहास, भूगोल, लेखनकला, निसर्ग, कलियुग, संसार अन कर्तव्ये, चित्रकला, हिंदू जाती, धर्म, विधवा विवाह, एकूणातच विवाह, सामाजिक सुधारणा, कामगार वर्ग अशा समाजाच्या अनेक अंगांचा विचार लेख, गोष्टी, प्रहसन, कविता, चित्रे इत्यादीतून केलेला दिसतो. मात्र गणितातील मनोरंजक चुटके असले तरी अलिकडे मासिकातून येणारे नुसते विनोदी चुटके मात्र यात दिसत नाहीत. अंकाच्या शेवटी ७/८ पाने भरून पुस्तकांच्या जाहिराती आहेत. अंकाची किंमत १ रुपया असून, वार्षिक वर्गणी ३ रुपये आहे.

मौजेचा दिवाळी अंक थोड्या वेगळ्याच आकारात आहे, अधिक उभट असा. तो वर्ष ३ रे, अंक २९ वा असा आहे. श्री अ ह गद्रे यांनी संपादन केले आहे. मात्र तो फक्त ४४ पानी असून, त्यात जरी जाहिराती असल्या तरी मनोरंजनाएवढया नाहीत. त्यात अनुक्रमणिका दिसत नाही. श्री स अ शुक्ल, श्री वि वा हडप, श्री भीमराव कोरान्ने, सौ सावित्रीबाई केंडे आदी लेखक आहेत. बऱ्याच कवितांवर कवींची नावे नाहीत. दोन तीन कविता या "चाल : गजल " अशा दिलेल्या आहेत.

वैशिष्टय म्हणजे यात बालगंधर्वांचे विविध रूपातले फोटो आहेत. मात्र हे कुठलेही अंक अतिशय स्पष्ट असे नाहीत हे ही सांगावेसे वाटतेच. वाचता येते, नीट दिसते, परंतु काही ठिकाणी थोडी अस्पष्टता आहेच. या अंकात मात्र विनोदी चुटके आहेत. जाहिराती विविध विषयांच्या आढळल्या तरी सिनेमा, नाटक अन वेगवेगळी पुस्तके यांच्या जाहिराती अधिक आहेत. सर्वात मजेची गोष्ट म्हणजे ' हमारे बगीचेमे पैदा हुआ फूलदणाणा" असे मी पूर्वी कुठेतरी पुस्तकात वाचले होते, बहुधा पु लं च्या पुस्तकात. तर त्याच शब्दात असलेली फूलदणाणा तेलाची पूर्ण पान जाहिरात या मौजेच्या मागच्या पृष्ठावर आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ३ रुपये १३ आणे आहे.

सत्यकथेचा अंक हा ३२ पानी असून किंमत ४ आणे आहे. श्री अनंत काणेकर, डॉ केतकर, श्री शामराव ओक, बाई सुंदराबाई, श्री श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी तो भूषवलेला आहे. जाहिराती आहेत पण प्रमाण कमी. मला वाटते पृष्ठसंख्याच कमी होत गेल्याने जाहिरातींचे प्रमाण कमी झालेले दिसते. याच अंकात सत्यकथेची वर्गणी वार्षिक ३ रुपये अशीही जाहिरात असून, कविता प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत असे स्पष्ट रीत्या लिहिलेले आहे. या अंकात एक शब्दकोडेही आहे. अंकाच्या मागील पृष्ठावर "Have you heard of HOUNSA ? " अशी हंसाच्या चित्रासकट जाहिरात आहे. कसली आहे ते दुसरीकडे चौकशी करून कळणार, असे खाली बारीक अक्षरात लिहिलेले आहे. हंस मासिकाची असावी की काय अशी मला शंका आली.

वरील तिन्ही अंकांच्या मुखपृष्ठावर रंगीत चित्र आहे. परंतु मे १९६६ मधला "सोबत" चा अंक अगदीच साधा दिसतो. की झेरॉक्स मुळे तसे झाले आहे समजत नाही. मनोरंजन व सत्यकथा हे आपल्याला परिचित अशा अंकासारखेच आकाराने आहेत अन मौज मघाशी म्हटल्याप्रमाणे थोडा उभट आहे. पण सोबत मात्र पूर्वी फुलबाग यायचा त्या आकाराचा छोटासा आहे. हा वर्ष पहिले, अंक पहिला, किंमत फक्त पैसे ३० असा अंक आहे. संपादक ग वा बेहेरे. अंकात श्री पु भा भावे, श्री नरुभाऊ लिमये, श्री आनंद यादव, श्री अनंत मनोहर, श्री वि शं पारगावकर, उषा परांडे, राजा मंगळ्वेढेकर आदी लेखक आहेत. अंकात दोन तीन कथा असून बाकी विचारप्रवर्तक लेख, ग्रंथ परिचय, घडामोडी बद्दल भाष्य, नाटक व चित्रपट परीक्षण, बालविभाग व राशी भविष्यही आहे. चुटके आहेत पण एकही जाहिरात नाही. अ दि कोकड यांचा एक केशभूषेवरचा लेख आहे. संपादकीयात म्हटल्याप्रमाणे हा अंक मराठी गरीब माणसाचं स्वतःचं मुखपत्र म्हणून चालू केलेला आहे. परंतु त्याच संपादकीयात एक वाक्य असेही आहे की देव आनंद, राज कपूर, सायरा बानू ह्या आदर्शांपासून खेचून उद्याच्या ताऱ्यांना नवा रस्ता अन नवा प्रकाश द्यायचा की नाही ? हे वाक्य वाचल्यानंतर मागील पृष्ठावरचा नटीचा फोटो मात्र खटकतोच.

जानेवारी १८८१ रोजीचा केसरीचा वर्ष पहिले अंक पहिला फुटकळ अंकाची किंमत अर्धा आणा अशी आहे. अंक ८ पानी असून त्यात अंक का सुरू केला याचबरोबर ३ लेख ( अर्थातच तत्कालीन बातमी व स्थिती यावर आधारित ) आणि वर्तमानसार, लोकल या सदरात देश विदेशच्या बातम्या आहेत. एकही जाहिरात वा चित्र नाही. कदाचित पहिलाच अंक असल्याने असेल. कारण जाहिरातीचे दर दिलेले आहेत.

१५ नोव्हेंबर १९५६ चा मराठाचा अंक त्या मानाने बराच अलिकडचा म्हणावा लागेल. तो ही वर्ष पहिले, अंक पहिला असा असून किंमत १ आणा आहे. प्रमुख बातमी ( headline ) ही " निवडणुकांसाठी काँग्रेस पन्नास कोटी रुपये उधळणार! " अशी आहे. म्हणजेच ५३ वर्षांनीही परिस्थितीत काही विशेष बदल झालेला दिसत नाही. बदल झालाच असेल तर तो फक्त परिमाणात. एकूण ४ पानीच पेपर असून, आकार मात्र अलिकडच्या वृत्तपत्रापेक्षा थोडा मोठाच आहे. "मराठी जनतेचा आवाज" हे संपादकीय असून, अगदी न्यूयॉर्क कापसाच्या भावापासून ते चुना व हॅट च्या जाहिरातींपर्यंत सर्व काही या ४ पानात आहे. इतरही बातम्या असल्या तरी राजकारणावर जोर जास्त दिसतो आहे.

असा हा संच मॅजेस्टिकने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत.