आठवावा काळ तेव्हापासुनी मी मीच आहे
कोंडमारा, मुक्त लाव्हा, नाइलाजी तीच आहे
का इथे आहे, कशाला सांगतो आहे मनाचे?
का इथे आहे असा की मी जणू नाहीच आहे?
मांजराची दोन पिल्ले खेळवावी बालकाने
रंजनाला जन्म मृत्यू पाळणे भारीच आहे
लागते कोठे कराया यायची काही तयारी?
जायची सारी तयारीही तशी झालीच आहे
वीट आला की मिळावे जे हवेसे वाटते ते
जे नको होते मला ते लाभले आधीच आहे