सौ स्वाती सामक यांनी दिलेल्या द्विपदीवर रचलेली कविता - विवाह!

पुण्यातील कवयित्री सौ. स्वाती सामक यांनी सुचवलेल्या एका द्विपदीवर ही कविता रचलेली आहे. वैवाहिक जीवनातील विविध रंग -

विवाह!

प्रत्येक दिवस सोनेरी जणु मंतरलेला होता
प्राजक्त मनावर माझ्या कुणि अंथरलेला होता

दरवळ या अस्तित्वाची चाफ्याला जिंकत होती
आकंठ निशा मधभरली, दिन साखरलेला होता

नजरेत प्रणय-उत्सुकता, शब्दात धुंद सूचकता
स्पर्शास दाद देताना कर थरथरलेला होता

आलिंगन ना सुटणारे, ओठात स्वाद मुरणारे
दोघांच्या रोमी रोमी लाव्हा झरलेला होता

जाणीव व्हायच्या आधी वेगात दिवस सरले ते
अवशेष सुगंधाचा त्या आता उरलेला होता

ते स्पर्श आज झालेले वहिवाटऱ्हक्क भासावे
आलिंगन सुटले जेव्हा हेतू सरलेला होता

सहजीवन अता 'चघळणे, अदृश्य दोष पुर्वीचे'
आवाज न मोठा ज्याचा तो बावरलेला होता

ते प्रेम तसे होतेही पण आजारात बळावे
एरवी अखंड बिछाना त्याने धरलेला होता

काळाने खटला भरला, प्राणांनी वकील दिधले
पण कारभार एकाचा बस आवरलेला होता

दुसरा फोडे हंबरडा, आयुष्य नकोसे झाले
पण काळ पुढे गेल्यावर तो सावरलेला होता