सारे भयंकर.....

जन्मणे, भोगून घेणे, भोगणे, आटोपणे सारे भयंकर!
लावणे आरोप खोटे अन खरे आरोपणे सारे भयंकर!

'वाटणे व्हावे कुणाचे', वेगळे,! होणे न होणे ते निराळे
ती कधी होणार माझी हे तिच्यावर सोपणे, सारे भयंकर!

सर्व अट्टाहास होता चाललेला याचसाठी आजवरती
लाभताना तेच, वेडा जन्म माझा लोपणे, सारे भयंकर!

हे उद्यावर, ते उद्यावर, चांगले सारे उद्यावर टाकलेले
आणि पश्चात्ताप नावाच्या उशीवर झोपणे, सारे भयंकर!

नाव, पैसा, प्रेम, निष्ठा, द्वेष, तारुण्यास काळाचा पहारा
काळजीने काळज्यांना काळज्यांवर थोपणे, सारे भयंकर!

वासना, हेवा, सदाची भूक होई दृश्य! नंगानाच चाले
एरवी माणूसकीची घातलेली टोपणे, सारे भयंकर!