कुणीच केले नसेल ते मी करून जावे
हवे हवेसे बनून येथे, मरून जावे
असे रडावे, बघून यावे हसू कुणाला
असे हसावे, बघून कोणी भरून जावे
धनी बनावे जसे कुणीही जगात नाही
सहाय्य साऱ्या जगास माझ्या घरून जावे
असे नसो दु:ख एकही जे मला न जाणे
निदान जन्मात एकदा वापरून जावे
कमी करावीत अंतरे मी मनामनांची
मिळेल ते श्रेय सोडुनी अंतरून जावे
कसे असावे कसे नसावे जगात कोणी
प्रघात माझ्यावरून सारे ठरून जावे (त)
अशी सुचावीत अक्षरे की वसंत यावा
पुरात शब्दांवरून जीवन तरून जावे
तुझ्यावरी जन्म उधळवो प्रेम एकतर्फी
प्रवेश अंतास आणता घाबरून जावे