नाती-गोती, देणी-घेणी घेवुन फ़िरतो आम्ही
काय असे समजावे ज्याला माणुस म्हणतो आम्ही
प्रत्येकातच ईश्वर दडला बोलत आपण सारे
पण नात्यांच्या हिंदोळ्यातच खेळत बसतो आम्ही
कुणी पहावी अन सांगावी ग्रह ताऱ्यांशी मैत्री
पण शेजारी वर्षातुनही पाहत नसतो आम्ही
दिधले ज्यांनी जीवन त्यांना देण्याचेच विसरतो
नारळ ठेवुन देवालाही मागत असतो आम्ही
माहित नसते विश्वालाही जिंकुन कोणी हरला
म्हणून छोट्या हारण्यातही लगेच खचतो आम्ही
कृतज्ञता, अस्मिता, नम्रता, तेज, ओज, करुणा अन
भावपूर्णता हृदयी असता माणुस गणतो आम्ही
सांभाळुन नाती-गोती, गुणसंवर्धनही सारे
मानवतेच्या खूणा जपाया प्रयत्न करतो आम्ही