तो अस्वस्थ आहे कारण
संपत आलं आहे
त्याच्या प्रीपेड श्वासांचं बॅलन्स
आणि रीफील करण्याइतपत
पुण्य नाहीये त्याच्या गाठी
आणि
तिचा मोबाईल तर युगायुगापासून स्वीच्ड ऑफ!
मग
हा तिढा सुटायचा असेल तर
आता एकच मार्ग उरलाय
तो म्हणजे सरळ जाऊन तिला विचारायचं.. की
"हा असा प्राणव्याकूळ अबोला कां? "
पण आता
असं समोरासमोर, एकमेकांच्या चेहऱ्यांवरचे भाव दिसत असताना... बोलण्याची
सवयच राहिली नाही.
आणि तिकडे
तीही वेगळ्याच काळजीत... की
हा असा समोर येऊन बोलायला लागला अन्
आपल्याजवळ उत्तर नसलं तर
बॅटरी संपत आल्याचा...
बहाणाही करता येणार नाही... मग काय?
(जयन्ता५२)