इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी -२

दिवेकर खाली उतरला. अत्यंत घाईघाईनं त्यानं चेहऱ्यावर गांभीर्य आणि नाटकी विनम्रपणा यांच्या समसमान मिश्रणाचा एक थर चढवला आणि आत पाऊल टाकलं. अर्थातच रिवाजाप्रमाणे शिक्षणचुडामणींकडे लोक आले होते, ते बिझी होते, त्यांनी पाच मिनिटं बसायला सांगितलं होतं, वगैरे.

मोठं होऊन बसलेल्या कुठल्याही माणसाला भेटण्यासाठी जितका वेळ ताटकळणं आवश्यक असतं तेवढं ताटकळून झाल्यावर तो एकदाचा आत गेला. आत शिक्षणचुडामणी आपल्या गुबगुबीत खुर्चीत जोधपुरीत बसले होते. दिवेकरचा हात हातात घेऊन त्यांनी दिवेकरचं तोंडभर स्वागत केलं.

"या, या, या, या, दिवेकर. फार वेळ थांबलात का? चला, पटपट बोलून घेऊ. मला लगेच बुर्कीना फासो देशाचे कल्चरल आंबेसेडर आलेत, त्यांना भेटायला जायचंय. बोला"

दिवेकरनं एक सूक्ष्म आवंढा गिळला. हा बुर्कीनो फासो देश नक्की कुठं आला, असं त्याला विचारायचं होतं, पण वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. "सर, तो पावटॉलॉजी कोर्स सुरू करण्यासंदर्भात मागं बोललो होतो.... "

"हो, हो, केला बरं का मी विचार, दिवेकर - करायचं हे आपल्याला. कल्पना तर पटलीय आपल्याला तुमची. काय अडचण दिसत नाही. नॉन ग्रॅंट बेसिसवर करु, म्हणजे मग बंधनं  नाही येणार कुठली; पण दिवेकर, माझ्या म्हणून काही शंका आहेत - तेवढ्या जर मिटवल्या तुम्ही, तर अगदी येत्या जूनलाही सुरवात करू आपण. "

शिक्षणचुडामणींना कल्पना पटलेली पाहून दिवेकरला हायसं वाटलं. शंकांची उत्तरं द्यायला तर तो तयार होताच. गृहपाठ पक्का करुनच तो आला होता. "विचारा ना सर... तुम्ही कुलगुरू - म्हणजे त्या नात्यानं तुम्हाला क्लीयर पाहिजेच सगळं.... तरच तुमचा आशीर्वाद लाभेल ना,सर! "(वा! मस्त वाक्य! )

"मला एक सांगा, 'पावटा' हा शब्द तुम्ही कुठून काढला? म्हणजे... त्याचा काय अर्थ घ्यायचा? त्याच्यामागे काही उद्देश आहे का खास? "

"आहे ना सर.. मी जरा सविस्तर सांगतो. 'पावटा' म्हणजे असा माणूस, की ज्याच्या कोणत्याही वागण्याबोलण्यात 'विवेक'... किंवा, कसं सांगू, चांगुलपणा, माणुसकी, कुठल्या नात्यांबद्दल आदर असे कोणतेही गुण दिसत नाहीत.... ही व्यक्ती संपूर्ण स्वतःपुरताच जगाचा विचार करते आणि विलक्षण मग्रूर, घमेंडखोर, रगेल आणि मुजोर असते. सभ्यतेचे कोणतेच नियम 'पावटा' या कॅटेगरीतल्या व्यक्तीसाठी नसतात. 'पावटे' हे समाजातल्या कोणत्याही स्तरात असतात. नवश्रीमंत आप्पलपोट्या समाजातल्या पावट्यांना आपण 'पंक्स' म्हणतो इतकंच. आणि दुसरं - 'पावटा' हा शब्द एकदम 'सेफ' आहे. "

चुडामणींचा चेहरा प्रश्नांकित झाला. "'सेफ' म्हणजे? "

"'सेफ' म्हणजे सर, आजकाल कुठल्या गोष्टीनं कुणाच्या 'भावना' दुखावल्या जातील याचा काही नेम नाही. 'पावटा' या शब्दाला कुठल्याही विशिष्ट वय, जात, समाज, शिक्षण, वर्ग, वर्ण, व्यवसाय याचा वास नाही, बंधन नाही. खरं तर 'पावटत्व' या स्वभावगुणाचा परीघ इतका विशाल आहे की अशा एखाद्या वर्णनात त्या महान आत्मकेंद्रित स्वभाववृत्तीला अडकवणं हाच मुळी त्याचा अपमान आहे. पण... आपल्या कोर्सनं त्या शब्दाला प्रतिष्ठा येईपर्यंत थोडीशी काळजी घ्यायला लागणार. 'पावटा' या शब्दानं अमुक कुणाकडं बोट दाखवलंच जात नाही आणि त्या वृत्तीला एक विशाल परिमाणही आपोआपच मिळतं. "

चुडामणी लक्ष देऊन ऐकत होते. "कोर्स केल्यानंतर काय देणार आपण या विद्यार्थ्यांना.... म्हणजे डिग्री, डिप्लोमा असं? "

दिवेकर हसला. "सर, हा कोर्स करून बाहेर पडल्यावर त्यांना इतकी प्रचंड मागणी सध्याच्या समाजात आहे आणि तीही अशा क्षेत्रातून, की तिथे डिग्री की डिप्लोमा या सटरफटर गोष्टींना महत्त्वच नाहीये. आपल्या विद्यार्थ्यांचं आत्मभानचं इतक्या तेजःपुंज पद्धतीनं वाढलं असेल, की त्यांना नोकरी / व्यवसाय देणाऱ्यांना पाहतक्षणीच ' हेच.. हेच ते! ' असा आत्मसाक्षात्कार होईल. तरीही सोयीसाठी आपण त्यांना आपला एक स्वायत्त डिप्लोमा ऑफर करू आणि सर, या कोर्सपुरती तर आपल्याला स्पर्धा नाही.... वुई विल बी युनिक! " लक्षपूर्वक ऐकणाऱ्या चुडामणींच्या उत्सुक चेहऱ्यावरच्या कुतुहलाची जागा आता प्रशासकीय विचारांनी घेतली होती. "मला सगळं नीट सांगा पण... प्रवेश कुणाला, कशाच्या आधारे देणार? अभ्यासक्रम कसा आखायचा? फॅकल्टी कोणकोण? तुम्ही अर्थात सविस्तर विचार केला असेलच म्हणा. "

आपली बॅग उघडून दिवेकरनं अत्यंत काळजीपूर्वक एक डॉकेट बाहेर काढलं. आता ती महत्त्वाची, निर्णायक वेळ आली होती. "ह्यात सर... मी सगळं खुलासेवार लिहिलं आहे. " ( रेट लेका दिवेकरा! महत्त्वाचं वाक्य न घाबरता रेट! तो स्वतःशी मनात म्हणाला.) "म्हणजे... सगळंच. तुम्ही आता विचारलेली माहिती तर आहेच, पण मुख्य म्हणजे रिक्वायर्ड फंडिंग आणि रेव्हेन्यू मॉडेल. म्हणजे, आपली दोघांची व्हीसी आणि डायरेक्टर म्हणून रेम्युनरेशन पण आहेत त्यात. कोर्स नुसता सेल्फ सपोर्टिंग नाही, तर चांगलाच प्रॉफिटेबल होईल सर! " (हुश्श! पैशाचं न घाबरता बोललो! )

पैशाचा, फंडिंगचा विषय आला की उगीचच इंग्रजी शब्द वापरणारी मराठी माणसं सज्जन असतात, असं चुडामणींचं अनुभवसिद्ध मत होतं. त्यांनी डॉकेट उघडून पाहिलं. प्रस्तावना, प्रकल्पाची सामाजिक गरज, लागणारी आर्थिक तरतूद, येणारा पैसा आणि त्याचे विविध मार्ग हे सगळं खरोखर व्यवस्थित, काटेकोरपणे लिहिलं होतं. परिशिष्ट १ मध्ये प्रवेशप्रक्रियेच्या परीक्षेचा नमुना पेपर दिला होता. विचारलेले प्रश्न पर्यायी आणि वर्णनात्मक दोन्ही स्वरुपाचे होते. सहजच ते वाचू लागले.

# संध्याकाळी हूड असलेली टोपी उलटी घालणे व पाऱ्याचा गॉगल घालणे यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला विशेष उठाव येतो असे आपल्याला वाटते का?
* नाही *होय * काय इचारता राव!

# खालीलपैकी कोणते आयुध आपण अंगावर सतत बाळगता?
* चाकू * चॉपर * चेन* बस्तर *गुप्ती

#आजवर जास्तीत जास्त किती मेगावॉटची स्पीकर भिंत आपण स्थानिक उत्सवात उभी केली आहे?
* १०० *५०० *१००० व अधिक

#सद्यस्थितीत आपले पालन पोषण कोण करतो?
*आई-वडील *स्थानिक दादा / नेता *श्रीमंत परप्रांतिय मित्र *तुला काय घेनं?

#आजमितीला किती क्षेत्रफळ (माफ करा, 'एरिया') आपल्या अधिपत्याखाली आहे अशी आपली खात्री आहे?
*दोन चौक *संपूर्ण वाडी *संपूर्ण (अमुक कोणताही) रोड *कंप्लेट गावात आपला टेरर है बंधो!

# हिंसाचारविषयक वर्णन करताना खालीलपैकी कोणता शब्द, शब्दसमूह आपणांस वैचारिकदृष्ट्या अधिक जवळचा वाटतो?
*तोडणे *टोले टाकणे *राडे करणे *रोवणे *टपकवणे *हितनं पैलं सुटायचं * हे सर्वच

# 'नडणे' आणि 'नष्टर' यातला फरक सुमारे पाच ओळीत स्पष्ट करा

#खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर दहा ओळींचे टिपण लिहाः
*आजवरच्या माझ्या आयुष्यातील रोमहर्षक हिंसाचार
*माझी 'भांडनं' का व कशी होतात?
* माझी वेशभूषा व त्याचा समाजमनावरील परिणाम

चुडामणींनी डॉकेट मिटलं. क्षणभर डोळेही मिटले. त्यांच्या वेळीच हा कोर्स उपलब्द्ध असता तर... स्वतःला सावरून त्यांनी मृदूपणानं दिवेकरकडे पाहिलं. "एक काम करु, दिवेकर. आपल्या कँपसमधील फिलॉसॉफी डिपार्टमेंटची छोटी बिल्डिंग आख्खी मोकळीच पडलीय. डिग्रीलाच पोरं येत नाहीत फिलॉसॉफीला! मास्टर्स वगैरे तर सोडाच! तिथं त्या बिल्डिंगमध्ये काढा तुमची ही झकास इन्स्टिट्यूट वेगळी. हॅ हॅ हॅ... ही पण फिलॉसॉफीच आहे, की हो. नव्या जमान्याची!! अभ्यासक्रम, काय डिग्री डिप्लोमा द्यायचा, ते तुम्ही बघा. बाकी ऍडमिशन, फंडिंग सगळं आमच्यावर सोडा, इकडं. चला, कामालाच लागा तुम्ही आता! "

(क्रमश:)