पुरूष ए वेदं

पुरूष ए वेदं

तेजानं तळपणाऱ्या सूर्याच्या

जळजळीत झळांना

आडकाठी न करणारं

लाहीलाही उमदेपणानं साहणारं

अनंत आकाश असतं ॥

सूर्याचा पारा उतरल्यावर

साठविलेली आग शमविण्यासाठी

अंधाराला सोबत घेऊन

चहूबाजूंनी दाटून आलेलं

वैष्णव गगन असतं ॥

गडगडतं, लखलखतं, कडाडतं

सुसाट वाऱ्यासंगं बरसणारं

तगमगत्या जीवांना

थंडाई देणारं मायाळू

शिवंकर आभाळ असतं ॥

सत्वर शांत होणारं

नितळ निळाई लेवून

चंद्राच्या झळाळीनं तेजाळणारं

लुकलुकणाऱ्या चांदण्यांना

अंगाखांद्यावर खेळवणारं

प्रजापिता नभांगण असतं ॥

तेच पुन्हा आकाश होणार असतं

आणि आभाळही होणार असतं ॥