वाऱ्याचे अश्रू

पानगळीच्या पानांचे पंख करून

वाऱ्यावर भटकणारी राजकन्या

थकून विश्रांतीला मॅपल  वृक्षाकडे परतते.

वाट चूकलेल्या पखरागत, भिऊन सैरभैर.

  वायोलिनच्या छेडलेल्या तारेप्रामाणे

  अंग झटकून पालवलेला मॅपल वृक्ष,

  तिला अनोळखी पुरुषासारखा वाटू लागतो.

  आणि त्याच्या पानांमधून घुमणारं कियानूचं संगीत अपरिचीत.

मग फिरू लागते ती आपल्याच राज्यात अनाहूतसारखी.

तिनं सजवलेल्या झाडांवर, निर्ल्लजपणे ओतलेला एकच रंग बघत.

  असह्य होउन एक दिवस घेते झेप, पर्वत माथ्यावरून

  कधीच गळून गेलेल्या पंखांच्या साक्षीने.

  आणि जमिनीवर पानांचा गलिचाही नसतो,

  तिला फुलासारखं अलगद झेलून घ्यायला.

मग लय बिघडलेला, राजक्न्येचा क्रूद्ध ईमानी वारा

आणि त्याच्यासमोर ओळीने उभे, रंग बदलणारे मॅपल  वृक्ष.

आपल्या नवीन रंगाची त्याच्या झंझावातात होणारी धुळधाण बघत.

    आसमंत ढवळून थकलेला वारा हळूवार अश्रू गाळत जातो,

    राजकन्येच्या थडग्यावरून.

    आणि मॅपल  वृक्षांनी शोक करायच्या आतच,

    होरपळलेला, ऋतू बदलून जातो.