मेंदूच्या चौकात...!

...................................
मेंदूच्या चौकात...!
...................................

स्वारांची नाही़; न हुशारांची गर्दी!
बाजूने माझ्या न हजारांची गर्दी!

व्यासंगावाचून धिटाईने बोले...
कुठल्याही विषयात टुकारांची गर्दी!

का दाटे काहूर मनी या प्रश्नाचे...
'का होई रक्तात विकारांची गर्दी? '

मागावे येथे न कुणाला काहीही...
ओठांवर आधीच नकारांची गर्दी!

माझेही अजिबात जमेना माझ्याशी...
- मग झाली दोघांत करारांची गर्दी!!

अर्थांना मिळणार कसे घर दर्जाचे?
शब्दांच्या गावात सुमारांची गर्दी!

ही आहे थांबून किती वर्षे येथे?
- मेंदूच्या चौकात विचारांची गर्दी!

- प्रदीप कुलकर्णी
...................................
रचनाकाल ः २१ मे २००९
...................................