निरव तराणे
=================
.
.
कुणी ना इथे काळा गोरा
कुणी ना इथे मोठा छोटा..
सुख दुःखाच्या लावून मात्रा
कशास त्या ममतेस मोजा..?
.
आपले परके भवती पाळले
कोलाहल हे कुणी अंतरा..
हृदया हृदयात तिच कंपने
कशास मग ती बोली भाषा..?
.
शब्दा शब्दास अनंत धुमारे
चकवे फसवे कितीक कंगोरे..
अव्यक्ताचे निरव तराणे
अखंड अविरत कानी असता..!
.
कशा कुणाशी हेवे दावे
कशा कुणाला डावे उजवे..
समष्टीची सारी लेकरे
एकच सर्वा काळही लेखे..!
.
तुफान सागर वाऱ्या संगे
परतूनी जाती ओढाळ लाटा..
भरती ओहटी कशा म्हणावे
जिथल्या तिथे जीवन वाहता..?
.
समोर दिसे ते कार्य आपले
साऱ्या घटनांचा तो कर्ता..
येण्या जाण्याचे सार्थक होते
आनंदाने आनंद वाटता.
.
.
=================
स्वाती फडणीस... २८-०५-२००९