वडापाव

पावही होता शिळा अन् आंबला होता वडा
एक पाण्याचा जुनासा ठेवला होता घडा
भूक ज्याला जाळते त्याला शिळेही चालते
खात होता तेच दादू, एक अर्धा नागडा

काळ त्याला आठवे तो आज सोन्यासारखा
माधवीशी लग्न झाले, योग स्वर्गासारखा
चालली होती सुखाने नोकरी, संसारही
माधवी ठेवायची दादूस राजासारखा

स्वाद हाताचा तिच्या येई स्वयंपाकातही
टापटीपेची सवय होती तिला कामातही
ती घराला सजवताना पाहुनी दादू म्हणे
बायको नाही अशी कोणास या गावातही

तोकडे उत्पन्न दादूचे कधी ना काढले
माधवीने जे असे नशिबात ते ते मानले
जीव ओवाळून टाकावा अशी ती बायको
वाटले दादूस जीवन सार्थकी हे लागले

रात्र होती जागण्याची, प्रेम ते होते नवे
माधवीही द्यायची जे प्रेम दादूला हवे
रंग आयुष्यास आले जे खरे ना वाटती
माधवीपुढती न दादूला सुचावी वैभवे

हौस दादूला पदार्थांची नव्या भारी असे
माधवीची पाकक्रियेतील तैय्यारी असे
पाहिजे ते मागणे अन माधवीने मानणे
वेगळे फर्मान दादूचे नवे जारी असे

त्यातही दादू वडापावावरी कुर्बानसा
माधवी आणे वड्याला स्वाद काही छानसा
तडस लागावी तरी दादू नको म्हणतो कुठे?
माधवीला त्यात वाटे आपला अभिमानसा

त्यात आपत्ती अचानक कोसळे दोघांवरी
काम झाले बंद, दादू येउनी बसला घरी
काळजी पाहून त्याची धीर देई माधवी
आणि बोले एक आली कल्पना मज अंतरी

काढुया गाळा, बटाट्याचे वडे विकुयात का?
त्यात काही फायदा होईलही बघुयातका?
लागते साहस जरासे,  भांडवल साधेसुधे
नोकरीच्या ऐवजी व्यवसाय हा करुयातका?

कल्पना ऐकून दादू केवढा आनंदला
माधवीची पाहुनी सारी हुषारी भाळला
बोलला, "लागू तयारीला, नको थाबायला"
माधवी आनंदली, आनंद दोघा जाहला

घेतला गाळा तसा दादू बसे गल्ल्यावरी
माल ताजा बनवण्याला माधवी होती घरी
चांगल्या स्वादामुळे धंद्यास तेजी लाभली
वाढली गर्दी अताशा खूप त्या गाळ्यावरी

फायदा झाला सुरू अन दैव थोडे उमलले
भूतकाळाला अता दोघे जरासे विसरले
वाढले उत्पन्न आधीहूनही धंद्यामुळे
नवनव्या घेऊन वस्तू त्या घराला खुलवले

व्याप तो वर्षात एका फार आता वाढला
मागण्या बाहेरच्या दादूस येऊ लागल्या
जायचा बाहेर दादू, माधवी गाळा बघे
काळ सोन्यासारखा गाळ्यास येऊ लागला

रोज आलेला नफा दोघे घरी मोजायचे
व्हायचे ते खूष, आनंदामधे झोपायचे
एक थप्पी त्यातली बँकेत रोजी जायची
आठवेना की कधी अपुले कसे चालायचे

त्यात बोले माधवी की वाढवू धंदा जरा
फायदा बाहेरच्या त्या मागण्यांमध्ये खरा
एकटी पाहीन गाळा, दोन पोरे ठेवुया
आणि तुम्ही ऑर्डरी घेण्यास बाहेरी फिरा

काय दादूला तिचेही प्रेम आले ऐकुनी
बायको नाही जगी कोणासही इतकी गुणी
कोण देते साथ कोणाची अशी दुनियेमधे?
भाग्य माझे लाभली पत्नी अशी या जीवनी

लागला दादू फिराया, मागण्याही वाढल्या
माधवी गाळा बघे, चिंता तिच्याही वाढल्या
वेळ थोडा राहिला बोलायला दोघांसही
फायदा वाढे बरोबर काळज्याही वाढल्या

रोज धंद्याचीच चर्चा, सारखे कामामधे
खंड आला लाड, गोष्टी आणखी प्रेमामधे
माधवी, दादू थकोनी येउनी झोपायचे
मात्र काही तेढ नाही यायची प्रेमामधे

एकदा दादू म्हणाला मी जरा कंटाळलो
थांबतो गाळ्यावरी मी भटकुनी वैतागलो
माधवी बोले अश्याने का कुठे चालायचे?
ठीक आहे बोलला दादू म्हणे मी चाललो

एकदा दादू म्हणाला माधवी ये ना जवळ
माधवी बोले तुम्ही येऊ नका माझ्याजवळ
खूप मी थकले, किती कामे, जरा जाणून घ्या
ठीक आहे बोलला दादू , न तो गेला जवळ

हे अताशा रोज होऊ लागले त्यांच्या घरी
एकही सुट्टी न, दादू रोजचा कामावरी
माधवीही रोज थोडी लांबशी झोपायची
रोज दादूला म्हणे तब्येत माझी ना बरी

एकदा एका हॉटेली पोचला दादू जसा
तेथला मालक जरासा हासला छद्मी असा
बोलला दादू असे का हासता मजला तुम्ही?
मालकाचे ऐकुनी धक्काच हा बसला असा

तू इथे फिरतोस लेका, बायको राहे घरी
माहिती नाही तुला की काय ती चाळे करी
बाजुचा गाळ्यावरी येतो तिला भेटायला
मर्द तू असतास तर बसतास तू गाळ्यावरी

धावला ऐकून दादू मालका मारायला
लोक सारे धावले दादूस त्या रोखायला
काढले बाहेर त्याला, मोजल्या लाखो शिव्या
लागले डोळ्यापुढे दादूस अंधारायला

पोचला गाळ्यावरी तो, पाहिले त्याने तिथे
पोरगा गल्ल्यावरी तो, पाहिले त्याने तिथे
माधवी गेली कुठे पुसता म्हणे "गेल्या घरी"
पोचला त्याच्या घरी तो, पाहिले त्याने तिथे

एक कोणी लेटला होता तिथे खाटेवरी
माधवी बाहूत होती, बातमी होती खरी
चालला होता प्रणय जो जाणला नाही कधी
आणखी झटक्यात दादू येतसे भानावरी

धावला मारायला तर माधवीने रोखले
आशिकाने घेत काठी टाळक्यावर मारले
बोलले दोघे, तुझे धाडस कसे झाले असे?
काय दादू बोलतो, वाईट होते लागले

आशिकाची गँग आली त्या घरी दुसऱ्या दिनी
दम दिला दादूस, फटके लावले संतापुनी
हो म्हणे बाहेर, येथे यायचे नाहीस तू
माधवी मिळणार नाही यापुढे तुज जीवनी

खूप होता धाक त्या भागात पोरांचा तसा
घाबरे दादू, म्हणे माझेच आहे घर जसा
माधवी बोले, घरावर नाव माझे लावले
आणि धंदाही असे माझ्याच नावावर तसा

लोक आले जे मधे पडण्यास त्यांना दम दिला
आशिकाने दाम पोरांना तसा छमछम दिला
माधवीला घेउनी तो आतमध्ये चालला
आणि दादूच्या सुखांवर आशिकाने जम दिला

आजही गल्लीत दादू राहतो वेड्यापरी
पाहतो त्याच्या घराला, हासतो वेड्यापरी
लागला शिक्का अताशा 'येथला वेडाच हा'
झोपतो, तो थांबतो अन चालतो वेड्यापरी

मारती पोरे खडे अन बायका फिस्कारती
माणसे पाहून त्याला टाळुनी धिक्कारती
भूक त्याला लागली की भीक थोडी मागतो
देउनी काही शिळे सारे अता झिडकारती

आपल्या गाळ्यावरी तो भीकसुद्धा मागतो
माधवीच्या हातचा कोणी वडाही टाकतो
खाउनी दादूस येते आठवण सारी जुनी
तेवढ्यातच पोरगा दादुस "जा, जा" बोलतो

आज आली आठवण सारी जुनी गाळ्यावरी
कोण आहे जाणणारे त्यास त्या गल्ल्यावरी?
एक वेडा हासणे, रडणे, जगाला सारखे
भार वाटे माणसांना आज तो भुतलावरी

पावही होता शिळा अन आंबला होता वडा
एक पाण्याचा जुनासा ठेवला होता घडा
भूक ज्याला जाळते त्याला शिळेही चालते
खात होता तेच दादू, एक अर्धा नागडा