एक वाघ एकदा
शहरात जाऊन आला
खांद्यावर पंचा टाकून,
डोळ्याला चष्मा लावून,
हातात ताकाचा पेला घेऊन,
म्हणाला, 'प्राणिमात्रहो,
सत्य सोडू नका
म्हणजे सर्व काही मिळेल
मी पहा राजा आहे
तुम्हाला मारण्याचे सत्य
मला बालपणीच उमगले
सत्याबरोबर सुख येते
सत्याबरोबर रक्त येते
सत्याबरोबर मासही येते
तुम्हाला दूध हवे तर
दूधही येईल .....कोणी सांगावे?
सत्यधर्म पाळा
यतो धर्मस्ततो जय:
सगळे प्रणीमात्र
अचंबित झाले
आणि कुजबुजू लागले आपसात
राजाचे नवे रूप पाहून
जाणते म्हणाले,
'जंगल भ्रष्ट झाले'
नवखे म्हणाले,
'काहीतरी नवी विचारसरणी दिसते'
बच्चे म्हणाले,
'आता दूध भरपूर येईल'
म्हातारे म्हणाले,
'जगायचे असेल तर वाघ व्हायला हवे'