नवल

मला 'ते' व्हायचे आहे

अन मला 'हे' नको आहे-

पण कुणाला तरी हवे आहे

जे आज माझ्याकडे आहे !

हेवा मम सुखाचा कुणा वाटे

परदुःख शीतल दिसे हेची खरे -

तयांना काय कल्पना त्याची

मला जे लागते भोगावे !

माहीत आहे माझे मला की -

होरपळ चालली आहे कशी

मीच म्हणुनी सोसतो ती

इतरां ते जमणार नाही !

सुटण्या अशा या त्रासातुनी

बस, मला 'हे' नको आहे-

मला 'ते' हवे आहे, मी

कांहीही मोल देण्या तयार आहे !

असे हे असले तरी

नवल वाटे मला त्याचे-

कुणा अन्या वाटे हवेसे

जे आज माझ्याकडे आहे !!