तव वचनांच्या अन्वयार्थ मी जगतो आहे,
माझे जगणे पुनःपुन्हा मी बघतो आहे ॥१॥
सापडतो कधि अर्थ नवासा, परंतु फसवा;
म्हणून का पण जुने अर्थ ते मनात ठसवा?
फसण्यासह मी नवा अर्थही घेतो आहे ॥२॥
कोण? कसा तू? कुणी पाहिले? तरी लालसा-
करण्या वर्णन शब्द मांडुनी, आणि तू असा !
सांत बुद्धिने अनंत मी धडपडतो आहे ॥३॥
बऱ्याचदा जीवनात मीही होतो अर्जुन
गोंधळतो, अन् तुझ्यापुढे करतोच समर्पण
मारून आत्मा स्वतः स्वतःचा, तगतो आहे ॥४॥
चुकलो, "आत्मा मारत नाही, मरतहि नाही"
मुख्य तुझे हे वचन, तरी ते स्मरतहि नाही
'करून सारे, अलिप्त होणे शिकतो आहे' ॥५॥
माझे जगणे, पुनःपुन्हा मी बघतो आहे !