मेघ काळे दाटलेले वेळ झाली पावसाळी
शुष्क ओठी पालवीचे गीत आले पावसाळी
कोरडे आयुष्य गेले ही कुठे तक्रार आहे ?
कैक होत्या आठवांनी चिंब रात्री पावसाळी
दूरदेशी ऊन-वारे, सोसताना-राबताना
ओढ लावीती घराची..दोन डोळे पावसाळी
मूक दोघे - सोबतीला बोलका पाऊस होता
आज तो वर्षाव ना, कोठून नाते पावसाळी ?
काय हा पाऊस वेडा- शोधतो माझ्यासवे तो
बालकांची कागदी ती आरमारे पावसाळी !