ह्यासोबत
आपलं बोलणं एकून संपूर्णतः भंजाळलेल्या मॅंडीच्या चेहऱ्यावर उमटलेलं भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह वाढता वाढता वाढून थेट अमेरिकेमध्ये फोनवर बोलत असलेल्या प्रीती पर्यंत जाऊन पोचलं असावं कारण त्याच्या उत्तरार्थ ती लगेच म्हणली,
"मला कल्पना आहे, तुमचा गोंधळ झाला आहे. पण भारतातल्या, पुणे, दिल्ली, बंगलोर मधल्या, काही निवडक संगणक व्यावसायिकांसाठी आम्ही आमची ही सेवा 15 दिवस मोफत देण्याचं ठरवलं आहे. तुम्ही पंधरा दिवस तुमच्या काही प्रश्नांवर विचार करण्याचं काम आमच्याकडे आऊटसोर्स करून पाहा आणि त्या पंधरा दिवसांत तुमचा आमच्या सेवांवर विश्वास बसला, तर तुम्ही आमचे वार्षिक वर्गणीदार होऊ शकता. "
हे काहीतरी भलतंच निघत होतं. हे खरं आहे, की कोणीतरी आपली चेष्टा करतंय याचीही खात्री होत नव्हती. माझा विचार तुम्ही करणार म्हणजे काय, तुम्हाला कसं कळणार कशाचा विचार करायचा ते, तुम्हाला माझे सगळे प्रश्न सांगणं कसं शक्य आहे. तुम्ही अमेरिकेत... मी इकडे. छे. अशक्य आहे हे सगळं. आणि मुख्य म्हणजे तुम्ही तो विचार केलात, तरी तुम्ही तो विचार नीट करताय की नाही याचा विचार माझ्या मनाला सतत सतावत राहील, त्याचं काय? तुम्हाला आऊटसोर्स केल्यावर माझ्या मनातून तो विचार हद्दपार कोण आणि कसा करणार? की तुम्ही ज्या प्रमाणे भारताला काही प्रोसेसेस आऊटसोर्स करून नंतर निर्धास्त होता आणि केवळ आधी ठरवून दिलेल्या कालमर्यादेनुसार त्या त्या वेळी त्या त्या गोष्टींचे टप्पे गाठले जाताहेत की नाही, याची खात्री करत राहता, तसं करायचं? असे लाख प्रश्न खरं म्हणजे मनात येत होते. पण यातला एकही प्रश्न प्रीतीला न विचारता,
"पण तुम्ही माझी निवड का केलीत? आणि तुम्ही मराठी कसं काय बोलताय? " हेच दोन येडछाप सारखे प्रश्न मॅंडीनं विचारून टाकले.
"आमच्याकडे निवडीचं सुद्धा एक विशेष तंत्र आहे, सर. गुगल कंपनीशी आमचा करार झाला आहे. गेलं वर्षभर आमचे संशोधक यावर संशोधन करताहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये, गुगलवर तणाव व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, किंवा तत्सम विषयांवर माहिती मिळवण्यासाठी ज्या संगणक व्यावसायिकांनी शोध घेतला आहे, त्यांचा शोध आम्ही आमच्याकडे डेव्हलप झालेल्या विशेष क्रॉलर्सच्या आधारे घेतला. खरं म्हणजे असे लाखो लोक निघाले. पण त्या यादीमधूनही काही जणांची निवड आम्ही लकी ड्रॉ च्या आधारे केली आणि त्यामध्ये तुमचं नाव निघालं. "
"आय ऍम द चोझन वन. " आज आपण घातलेल्या "तंत्रा" च्या टी-शर्टवरची कॅच लाईन एकदम मान वर काढून आपल्याकडे वाकुल्या दाखवत बघू लागल्यासारखं मॅंडीला वाटलं आणि फारच हसू आलं, पण प्रीती पुढे बोलतच राहिल्यामुळे त्यानं स्वतःचं हसू आवरलं.
"... आणि भाषोबद्दल विचाराल, तर प्रत्येक माणूस आपापल्या मातृभाषेमध्ये विचार करतो. आमच्या ग्राहकांना आमच्याशी संवाद साधायला मोकळेपणा वाटावा आणि मुख्य म्हणजे, त्यांचा विचार, त्यांच्या मातृभाषेतच व्हावा म्हणून आम्हाला भारतीय भाषांचं विशेष प्रशिक्षण दिलं आहे. खरं म्हणजे माझं नावंही प्रीती नाही... पामेला आहे. पण तुमच्यासाठी मी प्रीतीच. खरं तर मला हे सांगायची परवानगी नाही, पण आपल्याला नीट समजावं म्हणून सांगते आहे.... तर, तुमच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी आम्ही तुमच्या प्रोजेक्टवर एका मनुष्याची नियुक्ती पूर्ण वेळ करू. त्याचा प्रोजेक्ट प्लॅनही आम्ही तुम्हाला दाखवू. शिवाय ती व्यक्ती काही कारणाने रजा असल्यास त्याच्या जागी काम करण्यासाठी आमच्या कडे "बॅक-अप" सुद्धा असणारच. बॅक-अप म्हणून काम करणाऱ्या व्यकीला सुद्धा तुमच्या प्रश्नांबद्दलचं संपूर्ण "नॉलेज-ट्रान्सफर" व्यवस्थितपणे करण्याची जबाबदारीही आमचीच. "
मॅंडीच्या चेहऱ्यावरचे भाव झटाझट बदलू लागले. दरम्यानच्या काळात आपल्या जागेवरून उठून तो स्मोकिंग झोनमध्ये दाखल झालेला होता. धुराची वर्तुळं हवेत सोडत असतानाच, आपण नक्कीच ही ऑफर स्वीकारणार आहोत, याची खात्री तर त्याला झालेलीच होती. त्यामुळे आता त्याने अधिक उपयुक्त प्रश्न विचारायला सुरूवात केली,
"मला एक सांगा, तुम्हाला आऊटसोर्स करण्यासाठीचे विचार मी तुम्हाला कोणत्या स्वरुपात द्यायचे, म्हणजेच माझा इनपुट कसा असणार? "
"तुम्ही आम्हाला देण्याचा इनपुट दोन प्रकारे असू शकतो.... पण सॉरी, त्याआधी मी तुम्हाला एक सांगायचं विसरलेच. तुमच्या कामाची सुरूवात करण्यापूर्वी आम्ही तुमची संपूर्ण माहिती तुमच्या अकाऊंटमध्ये फीड करून ठेवणार. तुम्ही सॉफ्टवेअर क्षेत्रात आहात. त्यामुळे तुम्हाला बॅक-एंड आणि युझर इंटरफेस बद्दल माहिती असेलच. कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये, ते वापरणाऱ्या मनुष्याला वेगवेगळे पर्याय दिसतात. ही झाली युझर-इंटरफेस. त्या पर्यायांमध्ये ती व्यक्ती जी माहिती भरते, त्या माहितीच्या आधारे ते सॉफ्टवेअर तुम्हाला काही उत्तरं देतं, त्या उत्तराला लागणारी तर्कमीमांसा – प्रोग्रामिंग- जिथे केलं जातं, ते बॅक-एंड. तर आम्ही सुद्धा याच प्रकारे काम करतो. साधारणपणे कोणालाही सतावरणारे प्रश्न, हे उपल्बध पर्यायांपैकी कोणता निवडायचा याचेच प्रश्न असतात. प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये जो विचार करतो आणि त्याला अनुषंगिक जे निर्णय घेतो, ते त्याच्या पूर्वायुष्यामध्ये घडलेल्या काही घटनांच्या आधारे घेतो असा आमच्या संशोधकांचा विश्वास आहे. म्हणजेच प्रत्येकाचं प्रोग्रॅमिंग एका विशिष्ट प्रकारे झालेलं असतं. त्यामुळे आम्ही तुमच्या प्रश्नांचा विचार करताना, त्याचे हे बॅकएंडस तपासून बघायचा प्रयत्न करू. एकदा तुमचा कोडबेस समजला आणि नेमकी चूक कुठे आहे हे सापडलं, की प्रश्न झटक्यात सुटतोच. "
आता मात्र मंदार गोडसे एकीकडे खूप प्रभावितही होत होता आणि दुसरीकडे अमेरिकेच्या स्वार्थीपणाला शिव्याही टाकत होता. सुरूवातीपासूनच, खऱ्या अर्थाने मेंदू आणि सर्जनशीलतेच्या वापराची गरज असणारी कामं स्वतःकडे ठेवून, गधेमजुरीची कामं अमेरिकेने भारताकडे पाठवली. सॉफ्टवेअर हमालांची एक मोठ्ठीच्या मोठ्ठी फळी तयार केली इथे. आणि आता त्यामध्ये राबून राबून थकायला झालेल्या भारतातल्या संगणक व्यावसायिकांची कार्यक्षमता म्हणे कमी होते आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा, मदतीस धावून आल्याच्या खास अमेरिकन सवयीनुसार, अमेरिकाच अशी काहीतरी फंडू सेवाही आपल्याला देते आहे. या सगळ्यावर हसावं की रडावं?
प्रीतीने या संदर्भात बोललेली काही वाक्य मंदार गोडसेच्या या विचारसाखळीमुळे सुटली, पण तरी तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला लावता आला.
ती म्हणत होती, "पहिला पर्याय- मॅन्युअल आहे. तुम्ही सरळ आमच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या अकाऊंटमध्ये, तुमच्या आऊटसोर्स केल्या जाणाऱ्या विचारांची सविस्तर माहिती देऊ शकता. तुमचा नेमका प्रश्न सुमारे 30 शब्दांमध्ये, त्याची कारणं, त्याचा उगम नेमका केव्हा झाला याची ढोबळ माहिती, त्याचे परिणाम, आणि तुम्ही या प्रश्नाचा विचार नेमका कोण-कोणत्या निकषांवर करू इच्छिता हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी भरता येईल. "
अच्छा म्हणजे, मी इनपुट कसा द्यायचा याचे पर्याय ती सांगत होती तर.... मंदारच्या लक्षात आलं.
"आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमच्यासाठी आम्ही ही प्रक्रिया ऑटोमॅटिक करू शकतो. एक सेंटिमीटर बाय एक सेंटिमीटर च्या आकारचं एक चिपसदृश साधन आम्ही तुमच्याकडे ठेवायला देऊ. ते तुम्ही तुमच्या डाव्या दंडावर एक दिवस घातलंत, तर नेमके कोणते विचार तुम्हाला त्रास देताहेत आणि कशाच्या आऊटसोर्सिंग ची तुम्हाला गरज आहे, याचा एक सविस्तर रिपोर्ट आम्ही तयार करू आणि त्यानुसार कामाला लागू. "
मंदारला मेट्रिक्सची आठवण झाली. काहीतरी फारच विचित्र, परग्रहीय असं काहीतरी त्याच्या मनाला चाटून गेलं. प्रीती अजूनही बरंच काही बाही बोलत राहिली. पण मंदारची विचारचक्र आता वेगळ्याच दिशेला फिरू लागली होती. आपण ही ऑफर स्वीकारली असल्याचं फक्त त्याने तिला सांगितलं आणि स्वतःचा इ-मेल आय. डी. तिला दिला. अकाऊंट उघडण्यासाठी लागणारी सर्व माहिती त्यावर कळवण्यात येईल, असं सांगून आणि मंदारने तिला दिलेल्या वेळासाठी त्याचे अदबशीर आभार मानून प्रीतीने फोन संपवला.
फोन संपल्यापासूनचा संपूर्ण दिवस मंदारने काहीही काम न करता घालवला. एक भलं मोठं स्वगत त्याच्या मनामध्ये सुरू होतं. आपल्याला त्रासदायक असे सगळे विचार आता आपल्यासाठी दुसरंच कोणीतरी करणार, ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी आहे? आणि माझ्यासारखा माणूस ही ऑफर स्वीकारायला कसा तयार झाला? की केवळ हे मोफत आहे, म्हणून चान्स घ्यावा असं वाटलं आपल्याला? विचारांचं हे आऊटसोर्सिंग केल्यावर माझं काय होणार? माझ्या मनात त्रासदायक विचार येणार नाहीत? पण नेमके कोणते विचार मला त्रास देतात?
फावला वेळ घालवण्यासाठी कोणता छंद निवडावा, त्याला किती वेळ द्यावा, ताण कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा, लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला नेमकं काय करून खूष करावं इथपासून ते निवडणुकीमध्ये मत कोणाला द्यावं, सतत होत असणाऱ्या बॉंबस्फोटांबद्दल स्वतःची नेमकी भूमिका काय असावी, राज ठाकरे तरुणांनी उद्देशून बोलत असलेलं सगळ बरोबर की चूक, डॉलरची रुपयांमधली किंमत कमी कमी होत असताना, रुपयाची किंमत वधारली म्हणून खूष व्हावं की डॉलर घसरला म्हणून दुःखी होऊ.... हे असं कितीतरी मला त्रास देत राहातं. मग आता हे सगळं कोणी अमेरिकन माणूस माझ्यासाठी ठरवणार?
हे स्वगत सुरू असतानाच, कुठून तरी एक मोठ्ठा स्पॉट-लाईट आपल्यावर पडल्याचा भास मंदारला झाला आणि अचानक त्या प्रकाशामध्ये त्याला त्याच्या भोवती काहीतरी वेगळंच दिसायला लागलं. दहा वर्षांपूर्वीची काही चित्र... त्या चित्रांमध्ये होतं त्याचं शहर, शहरातली माणसं, त्यांचे पोशाख, त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना, त्यांची घरं... हे सगळं सेकंदभराच्या आत डोळ्यासमोरून तरळून गेलं आणि तीच सगळी त्याच्या आसपासची माणसं त्याला आजच्या दिवशी दिसली... कोणा अमेरिकन माणसाने घडवल्यासारखी.... त्याचेच टि. व्ही. चॅनल्स बघणारी, त्याच्यासारखाच पोशाख करणारी, त्याच्यासारख्याच राहणीमानाची आकांक्षा करणारी, त्याच्यासारख्याच किंबहुना त्याच्याच देशातल्या घराची स्वप्न बघणारी... काय फरक आहे? आत्ता सुद्धा कोणत्याही प्रकारचं विचारांचं आऊटसोर्सिंग न करताही आपण तसेच तर होऊ घातलोय.....
++++++++++++++++++++++++++++
दुसऱ्या दिवशी इ-मेल्स बघितल्यावर अपेक्षेप्रमाणे मंदारला प्रीतीची इ-मेल मिळाली. नोंदणीची सविस्तर माहिती त्यामध्ये होतीच. त्यानुसार मंदारने "डब्ल्यू एंड एल" च्या वेब-साईटवर जाऊन स्वतःची शक्य तेवढी माहिती दिली आणि त्याला त्रास देणारा पहिला प्रश्न त्याने या अमेरिकन कंपनीला "विचार करण्यासाठी" आऊटसोर्स केला, त्यांना अपेक्षित असणाऱ्या साच्यामध्येच:
नेमका प्रश्न (कमाल 30 शब्द):
मॅक-डोनल्ड पासून माझ्या आयुष्यात शिरलेल्या अमेरिकेच्या वैचारिक वसाहतवादाचा मला त्रास होतोय. यापासून माझी सुटका मी कशी करून घेऊ? की याला पर्याय नाही?
प्रश्नाची लक्षणे:
वाण्याच्या दुकानातून आणायची, तेच सामान माझी आई सुपर मार्केटमधून खरेदी करायला लागली. विचार न करता लक्ष्मी रोडवरून कपड्यांची खरेदी करणारा मी रिबॉक, नाईकेशिवाय टी शर्टस घालणं टाळायला लागलो. मित्रांना देण्याच्या पार्टीसाठी मॅक-डी शिवाय दुसरा पर्याय सुचेनासा झाला. इथली निवडणूक, इथलं राजकारण, इथले सण यांवरची चर्चा निरस वाटायला लागली, पण अमेरिकेला जाणाऱ्या मित्रांच्या व्हिसा मिळवण्याच्या चर्चेमध्ये मात्र भयंकर रस वाटू लागला. ही सगळीच लक्षणं, अमेरिकेच्या वसाहती माझ्यासारख्या लाखोंच्या मनात, मेदूत, विचारांत तयार होऊ लागल्याची आहेत.
परिणाम:
माझ्या राहाणीमानामध्ये झालेले हे सगळे बदल सुरुवातीला आवडले होते. पण आता माहिती नाही का, पण या सगळ्याचा त्रास होतोय. इथे घडणाऱ्या कोणत्याच चांगल्या गोष्टीवर, चांगल्या चळवळींवर, चांगल्या लोकांवर विश्वास वाटेनासा झाला आहे. इथे काही चांगलं घडूच शकणार नाही अशी खात्री होऊ लागलीय. माझं बोलणं, माझे शब्द, त्या शब्दांमागची विचारसूत्र... बहुधा आऊटसोर्स झाली आहेत... तुम्हालाच... अमेरिकेला.
++++++++++++++++++++++++++++
हा प्रश्न "डब्ल्यू एंड एल" ला आऊटसोर्स केल्यानंतर का कोण जाणे... डोकं एकदम रिकामं रिकामं वाटलं.. अलिकडच्या दहा वर्षात, कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे जागोजागी उगवलेले अनेक प्रश्न उगीचंच निकालात निघाल्यासारखे वाटले. आपल्या नावावर असलेला एक मोठ्ठा s1p1 डिफेक्ट एकदम दुसऱ्याच्या नावावर टाकल्यावर कसं वाटेल, अगदी तसंच काहीसं त्याला झालं. आणि एक भला मोठ्ठा श्वास घेऊन, त्याच्या अमेरिकन कंपनीसाठी भरपूर कार्यक्षमतेने काम करायला मॅंडी पुन्हा एकदा सज्ज झाला.