आज दाटून आलयं आभाळ... अनावर...
कुणीच नाही सोबतीला,
हरवलीय माझी छत्री,
आडोशाला उभी मी गारठलेली.
भिजलेल्या डोळ्यांनी पाहते,
हा कोसळणारा चक्रम पाऊस.
वाट चुकलेलं कोकरू जसं..
मन बिथरलयं माझं.
नकळत गाठते मला तुझी धुंडाळणारी नजर..
पुन्हा तोच क्षण, तोच पाऊस,
तेच वळण अन त्याच वेगळ्या दिशा,
फक्त आज....
तू हलकेच केलीस मूठ पुढे छत्रीची,
कुठल्याशा विश्वासाने... अगदी ठामपणे.
पण माझा मौन नकार,
कारण..."माझा तुझा प्रवास वेगळ्या दिशांना",
"जा पुढे तू" निश्बदच बोलले... तुझी नजर टाळून.
मी सांगाव आणि तू ऐकावं निमूटपणे,
शक्य झालयं का कधी? काही अपवाद वगळून.
एकच छत्री.. कुठे पुरतेय तुला मला?
अखेर तुच बंद केलीस,
अडसर नको तिचा आपल्या दोघांत.
पुन्हा प्रवास सुरू झालाय "आपला",
आज तुझ्या डोळ्यांनी पाहते मी हसून..
चिंब भिजलेलो आपण, पाऊसात हरवलेल्या दिशा, बंद छत्री.
माझा तुझा, "आपला" प्रवास हरवलेल्या दिशांना..
त्याच वळणावर....