अवधान

अंतविरहित स्वप्नासारखे,
गाभुळलेल्या चांदण्यासारखे
आकाशसरींच्या प्रसवासारखे
दान दे, दान दे.

एकटक अभावित दुःखासारखे
प्रचंड पराभूत श्वापदासारखे
कोसळणाऱ्या जलधारेसारखे
उजळलेले निर्वाण दे.

अंगमिटल्या प्रारब्धासारखे
अर्धमिटल्या रात्रीसारखे
घासवेगळ्या हातासारखे
अभावाचे परिमाण दे.

पोरसवदा मुलीसारखे
ऊनवेगळ्या सावलीसारखे
गाभाऱ्यातल्या तेजासारखे
नित्यनवे अवकाश दे.

कसा अजन्म रक्षावा हा
कसा प्रपंच सोसावा हा
बुद्धीजन्य स्वार्थास माझ्या
दयाघना, अवधान दे.