सत्यमेव जयते

सत्यास नको व्यत्यास

महाजन सांगती सारे ।

असत्याविना सत्ता नसे

पुढारी दाखविती सारे ॥

रमेचा हव्यास नको

ती चंचला सांगती सारे ।

असत्याची शृंखला तिज कोंडते

पुढारी दाखविती सारे ॥

कनक कांता शीलभंजक

साधुजन सांगती सारे ।

मद्य मैथुन पुरुषार्थ लक्षण

पुढारी दाखविती सारे ॥

विद्या व्यासंग सांडू नये

थोरजन सांगती सारे ।

विद्येचा धंदा बरकतीचा

पुढारी दाखविती सारे ॥

स्वाभिमाने राष्ट्र फुलते

वीरजन सांगती सारे ।

बळिपुढे लांगुलचालन बरे

पुढारी दाखविती सारे ॥

सुनीतीचा नको संन्यास

गुरुजन सांगती सारे ।

असंगाच्या संगाविना न राजेपण

पुढारी दाखविती सारे ॥

पुढारी जे करिती रूढ

तेची सत्य जाणावे कां रे?

त्याच सत्याला प्रतिष्ठा

बोध नवा घ्यावा कां रे?