लांबणारी क्षितीजे

लागते सोडायला जे आपल्याला भावते
लागते वागायला जे या जगाला भावते

एवढे लाचार होणे चांगले नाही म्हणा
आपले अस्तित्व पाहूया कुणाला भावते?

आजची चिंता जगाला कालच्या चिंतेपुढे
एकटा मी, वागणे ज्याचे उद्याला भावते

जीवनाची नाळ आता पाहिजे तोडायला
त्यागुदे सारे मला जे जे तुम्हाला भावते

जा हवा तेथे, क्षितीजे लांबणारी तीच ती
जीवनाची कैद मित्रा अंबराला भावते

शक्यतांच्या शक्यता की ओढ अज्ञानातली?
काय येथे नेमके जे माणसाला भावते?

मी तुझ्यावर सोडले आहे 'हवासा वाटणे'
चांगले सारेच कोठे चांगल्याला भावते?