आज होती बातमी
अपूर्व सागर भरतीची ।
पुरा बंदोबस्त करुनी
गेलो हौसे सागरतीरी ॥
मफलर स्वेटर मोजे
वायुकवच काळे मुलाचे ।
हल्ला पावसाचा थोपविण्या
कृष्णछत्रही हाती होते ॥
जरा दूर गर्दी टाळून
म्हटले जरा बसावे ।
बघताना थैमान सागराचे
ऐकले काहितरी चुकचुकले ॥
उठलो, डोकावुन पाहिले
दिसले घट्ट मिठीतले- ।
आडोशाला एका युगुलाचे
उधाण आलेले प्रेमचाळे ॥
चोरून असे बघण्याचे
पाप माझे आड आले ।
उबळ खोकल्याची अनावर
मज मेल्याहून मेलो झाले ॥
प्रेमिकांच्या विखारी नजरा
वर्षाव शतशब्दशरांचा ।
'आजोबा शांत झोपा ना घरी'
'कशाला कबाबातील हाडूक बनता?' ॥
जात असलेला तोल माझा
हातींच्या छत्रीने सांभाळला ।
उधाण आलेल्या मनाला
चुचकारत फिरलो माघारा ॥