किती किती कवितांमधे
बहरली रात्र अन हसली पहाट
सांज सुद्धा खुलली
अन शहारला नदिकाठ
गोडवे गायले प्रितीचे,मिलनाचे
अन अश्रु सुद्धा वाहले विरहाचे
पण तुम्ही कधी विचार केलाय
त्या एकट्या निरव दुपारचा
जिने अनुभवलेला असतो
तो गोड गुलाबी पहाटेचा स्पर्श
आणि क्षणापुर्वी खुललेला असतो
गाली गोड हर्ष
पण वेळेचे चक्र
जसजसे फ़िरत जाते
तसे जीवन बनते
एका पांढर्या कपाळानीशी जगणार्या
विधवेसारखे एकटे
पण हे कालचक्र आणखी थोडे फ़िरणार
निसर्ग घेवून येणार
एक लाजरी हसरी संध्याकाळ
आणि सर्व जग विसरणार
त्या भयाण एकल दुपारीला
मग पुन्हा ती जगणार
विराट आकाशात फ़िरणार्या
घारीसारखी...........
एकटी.............?