ही कविता आठव जेव्हा केव्हा जावे लागे रणांगणी

तव संभारावर उन्मादाचा लेप चमकता दरवळतो
यौवनभारावर काकजगाचा एकांगी डोळा खिळतो
तव चालीवर नजरा झुलती तव नजरेवर चाली ठरती
तू झुकव पापणी, घरी थांब जोवर या लाटांना भरती

पाऊल तुझे मातीस हवे, सहवास तुझा सोडे न हवा
ही नितळ पाठ किरणांना देते परावर्तनी जोम नवा
अंकूर तुझा कोमल बाहुंवर विसावतो विश्वासाने
जग पदराला बघते सरताना नजरांच्या आकाशाने

साखर जीभेची शिंपडली तर गैरसमज चारित्र्याचे
मध जिवणीतुन स्मित ओघळले की आंदोलन पावित्र्याचे
चोरांच्या हलक्या स्पर्शांवर तू मूग गिळुन हो बाजूला
तो करंगळीला झाला तर झटक्यात धारतो बाहूला

राखीचा धागा बसताना परका हातांना कुरवाळे
तो यौवन स्पर्शे नजरेने पण बहीण त्याला ओवाळे
आदरपुर्वक नमताना कर वृद्धाचा पाठीवर घसरे
घेऊन तसा आशीष तुझे राहोत सदा डोळे हसरे

तू कडी लाव दाराची बाई प्रातःकाळी सजताना
शेजारी मुलगा वयात आला चोरुन तुजला बघताना
जो दीर आपला वाटला तुला तो नवऱ्याच्या धाकावर
घे घरात कोणी नसताना, ठेवेल हात तो खांद्यावर

ही अंधाराची किमया सारी श्वशूर माजावर येतो
ही बदनामीची भीती सारी शब्द न ओठावर येतो
जे नोकरीत माया करती ते वरिष्ठसुद्धा हपापले
जे प्रवासात दे सहाय्य त्यांचे श्वास धगीने धपापले

ही दुनिया 'त्याची' आहे येथे 'तिला' न काही स्थान असे
जर सुटली तर बदनाम बिचारी वश झाली तर मान असे
बस तुझ्याचसाठी सृष्टी झाल्यापासुन युद्धे करतो 'तो'
त्या दोन क्षणांच्या सुखापुढे मारून कितिंना मरतो तो

वय, काळाचे, स्थानाचे, नात्याचे, दिसण्याचे भान कुठे
हा निसर्ग वखवखलेला सारा, त्यागाचे अवधान कुठे
नर मादीचे नाते केवळ इतिहास अधोरेखित करतो
जो तुझ्यात घेतो जन्म पुढे तो तुलाच विस्थापित करतो

पण तरी तुला हे करायचे....

पण तरी तुला हे करायचे की सहन कधी ना करायचे
त्यातिथेच असल्यांचा बुरखा खेचून नागडा करायचे
मग साथीला येतात हजारो हात अशा अबलेसाठी
स्त्री घरंदाज असली नसली, दुनिया जमते वेश्येसाठी

माणुसकी आहे जगात, केवळ जागवायची आहे ती
ती ताकद आहे तुझ्यात, केवळ दाखवायची आहे ती
नर-मादीच्या नात्याला दे वाघीण बनोनी तिलांजली
ही कविता आठव जेव्हा केव्हा जावे लागे रणांगणी