पुरोगामी! (एक छोटीशी गोष्ट)

"आई-बाबा फारच मागं लागले आहेत. रोज रोज मागे लागून नवीन नवीन स्थळं दाखवतात.
साला लग्न मला करायचंय, पण घाई ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही.
आपण आपल्या मर्जीनंच पोरगी पाहणार.
साला रोज रोज तिथून इतक्या लांबून भारतातून फोन करतात आणि विषय काय, तर "काय ठरवलंस? कधी पाहायची? "
छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही, तोच लक्ष लॅपटॉपच्या
(चल संगणक=लॅपटॉप? ) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा? ) गेलं. फुकटात ढीगभर साय मिळाल्यावर एखाद्या बोक्याला होईल,
तशा आनंदाने येक आवंढा गिळून, मोठ्ठे डोळे करून बसलो चॅटिंगला.
" सुधीर वैतागून सांगत होता.

पण चेहऱ्यावरचे भाव आता जरा छान झाले. तो म्हणाला...
" ती हां तीच स्पृहा. वर्ग सखी., राष्ट्रीय पातळीवर ऍथलीट म्हणून मान्यता पावलेली.
वर्गात मुलींशी बोलायला कधीच फारसं जमलं नाही.
पण तिचं मोकळं ढाकळं वागणं, सहज मिक्स-अप होणं जाम आवडायचं.
तिचे बऱ्याचदा वर्तमान पत्रातून बक्षिसं घेतानाचे वगैरे फोटो येत. तेही छान वाटायचे.
शिवाय कुणाशीही बोलताना ती लागलीच बोलतं व्हायची, बोलतं करायची.
एखादा जोक आवडला तर पटकन टाळीही द्यायची. (म्हणून मी जोक मारायचे अनेक अयशस्वी प्रयत्न पण केले. )

आता नाही म्हटलं तरी, तिच्या स्वभावानुसार मिळता जुळता जॉब मिळाला होता. एच आर चा, अगदी नुकतीच ऑफर आली होती.
आणि खेळणंही अजून चालूच होतं.
चॅटिंगलाही मला तिचा हाच स्वभाव आवडायचा. वेब कॅम तर सगळेच वापरतात, पण ही अगदी मॉडर्न स्टाइल मध्ये घरी
ज्या ड्रेस वर असायची, त्यावरच चॅटींग करायची. उगीच "काकू"बाई सारखं नाही.
सदैव आपली ती बर्म्युडा येक असायची अंगावर आणि स्लीव लेस पांढरा शुभ्र टी-शर्ट.
आणि अंग काठी निव्वळ शिड शिडित, ऍथलीटची, स्वभावात मोकळेपणा. तजेलदार सावळा रंग.
मी तर भारतीय "शारापोवा"च म्हणेन तिला, तिच्या टवटवीत पणावरून.
बरेच दिवस अशा ऑन लाइन गप्पा चालायच्या.
अगदी "गांगुली म्हातारा झालाय की द्रवीड " इथ पासून ते अगदी कॉलेज मधल्या दिवसांबद्दल.
किंचित खेचाखेची चालायची आणि थोडाफार चावटपणा आणि चावटगप्पा सुद्धा.
वाटलं "अहा.. काय सही आहे ही जोडीदार म्हणून. किती मोकळी आहे. हिच्या सोबत राहणं म्हंजे दिवस भर गप्पा, मन मोकळेपणा
आणि शिवाय कुठलीही फालतू बंधनं नाहीत. " ही मिळाली तर काय होईल, मी स्वप्नातच इमले बांधून पाहिले,
त्या "काकू" स्टाइल वाल्या नवऱ्या सोबत फिरतानाही हातात हात घालायला घाबरतात रस्त्यावर. ही असेल तर
गळ्यात गळे घालून हिंडेन. पण आता कुणास ठाऊक आई-बाबा कुठलं लचांड पाहणारेत माझ्यासाठी. "

एवढ्यात आईचा फोन आला. तिकडून आवाज :- "अरे ऐकतोस का, मुलगी मिळाली रे त्या शादी डॉट कॉम वर तुला हवी तशी.
फोटोत सुंदर दिसतेय, कालच बोलले तिच्याशी. तुझ्याच कॉलेजची दिसतीय. नॅशनल ऍथलीट, फोटो आणि माहिती मेल केलिये तुला.
आता तू असं कर की.. "
आई एवढं बोलेपर्यंत मोबाईल झाला डिस्चार्ज, फोन झाला कट.
पण पण....
"नॅशनल ऍथलीट, माझ्याच कॉलेजची... म्हणजे.. स्पृहा तर नै? "
डोक्यात शंका आली आणि लगेच जाऊन मेल पाहिला.
तो... तोच फोटो. स्पृहाच ती.

म्हणजे आता हिच्या सोबत जन्मभर राहायला मिळणार तर.
आणि तिनं मग सांगितलं का नाही चॅट वर आपल्याला की आपलंच नाव तिला""स्थळ" म्हणून आलंय,
गंमत करायची, फिरकी घ्यायची म्हणून असं केलं तिनं?

"
पण.. पण.. एक मिनिट.. हे काय होतंय?
मी तिला होकार कसा देईन?
हे हे सगळं ठरायच्या किती तरी आधी पासून ही अशी बाह्या आणि तंगड्या उघड्या सोडून बसते वेब कॅम समोर.
म्हणजे, ही शहाणी, ज्याच्याशी फारशी कॉलेजातील धड पूर्ण ओळखही नाही त्याच्या समोर एवढी मोकळी राहते.
मग प्रत्यक्ष तिला भेटणाऱ्या लोकांसमोर कशी असेल?
छे.. हे असलं मला मुळीच आवडणार नाही माझ्या बायकोनं केलेलं.
अस कुणाशीही एकदम सलगीनं वागलेलं.
बायको आहे, तर बायको सारखं वागावं उगीच डोक्यावर बसू नये.
मी देईन ना मोकळीक, पण एका मर्यादेतच. अस दुसऱ्या पुरुषांशी इतकं कस बोलवतं हिला...
छ्या...
असल्या कॅरेक्टरची बायको नकोच आपल्याला.
त्या पेक्षा नकारच कळवतो तिला.
"

सुधीर "नकार" कळवायला जाऊ लागला फोन कडे.
त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्याचे)हे " सु विचार " ऐकून मी तसाही थोडासा चकित झालो होतो.
(माझं आश्चर्य आवरून ) त्याला मी म्हटलं "स्थळ चांगलं आहे -नाही मी काहीच म्हणणार नाही. ते तुलाच माहितिए.
पण एवढं नक्की, की तू नकार दिलास तरीही तुझ्यापेक्षा कैक पट चांगली स्थळं तिला मिळतील. "
तू आता फक्त ह्या विषयाबद्दल मौन धारण केलंस तरी हे लग्न होणार नाही. एखाद -दोन दिवसात होकार येईलच इतर
ठिकाणांहून तिला, मग चालेल का तुला? "

सुटकेचा नि: श्वास टाकत सुधीर खाली बसला. "मला लग्न नाहीच करायचं असल्या कॅरेक्टर वालिशी"
असं काहीसं पुटपुटला आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करून "मोकळ्या" विचारांच्या
गप्पा मारू लागला,
इतरांच्या होणाऱ्या बायकांशी!!
त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!