चुकामूक

     (काही ठिकाणी अक्षर, काना आणि चंद्रबिंदी एकाच वेळी कसे उमटवायचे, माहीत नव्हते. कृपया, तज्ञांनी सांगावे. मी युनिकोड वापरतो. रसभंगासाठी क्षमस्व.)
    
     "आमचं बुकिंग आहे.. "
      दोघेही एकदम म्हणाले आणि रिसेप्शनमध्ये तो आवाज घुमलाच.
      रिसेप्शनिस्टही चमकून वर पाहू लागली. क्षणात दोघांनाही हसू फुटलं.     
     "यू कंटिन्यू प्लीज. " ती.     
      नो. यू कंटिन्यू मॅडम... "तो.      
      तिने नाव सांगितलं, किल्ल्या घेतल्या आणि बाहेर जाऊन कोणाला तरी हाक मारली. परत येऊन ती पहिल्या मजल्याच्या जिन्यावरून पटापट चढतच गेली. गुलाबी टाप आणि निळी जीन्स. एका अत्तराचा गंध दरवळला. त्याने आज तेच अत्तर लावलं होतं. दृष्टीआड होण्याच्या आत तिने शेवटची एक नजर आपल्याकडे टाकली, असं त्याला वाटून गेलं. त्याचं लक्ष नकळतच स्वतःच्या जीन्स टी शर्टाकडे गेलं. त्यानेही किल्ल्या घेतल्या आणि तो रिसेप्शनच्या बाहेर गेला. जाताना आत य़ेणाऱ्या एका जाडसर तरुणाचा त्याला धक्का लागला. जाडसर पहिल्या मजल्यावर गेला. त्याच्या हातात बॅगा होत्या.     
      रिसेप्शनमध्ये तो परत आला. हातात बॅगा. सोबत एक साडीतली मुलगी. कंटाळलेली.     
     "किती वेळ लावलास रे बाहेर यायला... "    
     "तेवढा वेळ लागणारच. नाव सांगायचं, किल्ल्या घ्यायच्या म्हणजे.... "
     -----------
     दुसऱ्या दिवशी पहाटेच ती खाली आली. पहाट रिसेप्शनमध्ये भरून राहिली होती. दिव्यांचा अंधुक प्रकाश. पोऱ्या कोचावर झोपलेला. रिसेप्शनचं काचेचं दार ढकलून ती बाहेर आली. धुकं पाण्यासारखं पसरलं होतं. धुक्यातच तिला हालचाल दिसली. मिनिटभरातच तो असल्याचं दिसलं.
     "गुड मार्निंग. " तो.
     "गुड मार्निंग. "
     काही क्षण कोणीच बोललं नाही.
     "पेपरसाठी खाली आलो होतो. पण इथे लवकर येत नाहीत बहुतेक. माझ्या लक्षात आधी आलंच नाही. शेवटी, लांबचं हिलस्टेशन... "
     "हो... मीही त्याच्याचसाठी आले होते. मलाही लागतोच पेपर सकाळी सकाळी... ".
     एनी वे..
     बाय.. "
     एक आळस देऊन ती वर निघून गेली. 'बाय' म्हणायचं त्याला सुचलं नाही. तो फक्त पाहत राहिला.
     -------------  
     दुसऱ्या दिवशी दुपारी तो जेवायला बसला होता. शेजारी सा़डी. साडी निवांतपणे जेवत होती.   त्यांच्या जेवणाच्या टेबलपासून काही अंतरावरच तिचं टेबल होतं. तिच्याशेजारी तो जाडसर. अंतर होतं पण शब्द ऐकू येत होते.
     "मस्त आहेत नूडल्स.. अजून एक डिश मागवू का रे? "
     "नको. "
     "बरं मग, भाजी.. "
     "नको. झालं माझं. "
     त्यांचा संवाद अजून ऐकत राहावा, असं त्याला वाटत होतं पण शेजारच्या साडीच्या आवाजाने तो भानावर आला.
     "ए... किती तेल आहे नूडल्समध्ये! "
     "हो. थोडं जास्तच टाकलं आहे. "
     "थोडं नाही, खूपच. मी नाही खाणार. "
     "अगं मस्त झाल्यात. थांब, मी तेल जरा बाजूला काढतो. मग, खाऊ आपण. "
     "नको. तसंही झालंय माझं. "
     साडी हात धुवायला गेली.
     ------------
     संध्याकाळी बाजारात तो एका स्टेशनरीच्या दुकानात उभा होता. ओळखीचा आवाज आला.
     तीच.
     एक मोठा रुमाल हातात घेऊन ती निरखत होती. तिने आणखी काही नमुने पाहिले. एक रुमाल हातात घेऊन तिने दुकानातल्या आरशात पाहिलं. स्वतःवर खूष झाली. तेवढ्यात तो जाडसर तरुण आला.
     तिने विचारलं,
     "कसा दिसतोय? "
     "चांगला. " जाडसर बोलला.
     "म्हणजे माझ्यावर कसा दिसेल? ".
     "चांगला. "
     "फक्त चांगला..? "
     "हे घ्या बाईसाहेब.. आणखी व्हरायटी. " दुकानदार.
     ती पाहू लागली. तिने आणखी एक उचलला.
    "हा कसा दिसतोय...? "
    मागे वळून जाडसरला विचारलं. जाडसर दुसरीकडेच पाहात होता. तिने निवडलेल्या जांभळ्या रंगाच्या रुमालाशेजारीच एक गुलाबी रुमाल होता. ती तो घेईल असं त्याला वाटलं. पण तिने जांभळा घेतला आणि पैसे दिले.
    त्याच्याशेजारी साडी आल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही.
    "काय काय घेतलंस? "
    "काही नाही. पेन्स पाहत होतो... बघ बरं हे. "
    "नको. रंग नाही आवडला. "
    "मग, हा खण पाहा".
    "काहीतरीच आहे. "
    "बरं, तुला रिंग्ज वगैरे घ्यायच्या असतील तर शेजारीच आहेत पाहा".
    त्याने तिकडे बोट दाखवले. जांभळा रुमाल घेऊन ती निघून गेली होती.   त्याने लांबवर पाहिलं. पण ती कुठेच दिसली नाही.
   साडी शेजारच्या दुकानात गेली. जरा वेळाने आली.
   "बघू, काय घेतलंस"?
   "काही नाही. "
   "म्हणजे, रिंग्ज घेतल्या नाहीस? "
   "नाही आवडल्या. "
   "ते रुमाल मस्त आहेत बघ. घ्यायचाय का एखादा.? "
   "आधीच भरपूर आहेत. "
   --------------
   रात्री कामन रूममध्ये तो मालिका पाहात बसला होता. ती तिथे आली.
   "हॅलो. "
   "हॅलो. एकट्याच? "
   "हो. तो झोपला लवकर. "
   "तुम्हीही एकटेच? "
   "हो. मी विचारलं तिला की, खाली टीव्ही पाहायला येतेस का, तर नाही म्हणाली. मी जाईपर्यंत कदाचित् झोपलीही असेल. "
   "..... बाय द वे, मी राजाध्यक्ष. "
   "मी मिसेस इनामदार".
   "नाईस टू मीट यू. पाहा तुम्हाला काय पाहायचं ते. घ्या रिमोट. "
   "नाही नाही. तुम्ही पाहा जे पाहताय ते.. "
   "मी आता एक कामेडी सीरीअल लावणार आहे... चालेल ना? "
   "बाय आल मीन्स. ग्रेट. मलाही आवडते कामेडी. "
     पुढचा एक तास ते दोघे ती सीरीअल पाहात होते. टीव्ही हालमध्ये दुसरं कोणीच आलं नाही.
    -------------
    तिसऱ्या दिवशी संध्याकाळी रिसेप्शनमधून मिळवलेल्या प्रेक्षणीय स्थळांच्या माहितीपत्रकासह तो हाटेलच्या गेटबाहेर उभा होता. शेजारीच रिक्षा उभी होती. तेवढ्यात साडी आली. आज ती पंजाबी ड्रेसमध्ये होती. दोघेही रिक्षामध्ये बसले आणि रिक्षा सुरु झाली. बसता बसता त्याला ती आणि जाडसर हाटेलमधून बाहेर पडताना दिसले. एरवी साध्या शर्टमध्ये असलेला जाडसर आज टी-शर्टमध्ये होता.
    सनसेट पाईंटच्या कठड्याला रेलून तो पूर्ण बिंब डोळ्यात साठवत उभा होता. बिंबाच्या अलीकडे निळे डोंगर. त्यांच्याही अलीकडे खोल पसरलेली दरी. उजवी-डावीकडे काही जोडपी. एक खारे दाणेवाला.
    तो अगदी मध्यभागी. भान हरपून तो उभा होता. कॅमेरा आणला आहे आणि खारे दाणे घेतलेले आहेत, हे तो केव्हाच विसरुन गेलेला होता.
    तेवढ्यात हालचाल झाली.
    "हॅलो, मि. राजाध्यक्ष. "
    "हॅलो, मिसेस इनामदार".
    "एकटेच? "
    "नाही, जया म्हणाली की तू हो पुढे म्हणून. जया... जया तिचं नाव. तो पलीकडचा पाईंट आहे ना तिकडे होतो आम्ही. मी म्हणालो की, सनसेट पाईंटला चल. तर ती म्हणाली तू हो पुढे. मी येतेच पाच मिनिटात. बराच वेळ झाला.. आलीच नाही.
    "तिकडून दरीतली फुलं चांगली दिसतात ना. ती पाहात बसली असतील त्या. "
    "आणि तुम्ही एकट्याच? मि. इनामदार कुठे आहेत? "
    "सुजय येतोय मागून. एका झाडाच्या फांदीला काठी करतोय. "
    "सनसेट मस्त दिसतोय ना..? "
    "खूपच. "
    "एक विचारू..? "
    "हो. विचारा ना. "
    "तुमचं लव्ह की अरेंज्ड? "
    "आमचं अरेंज्ड. तुमचं? "
    "सेम. "
    काही क्षण फक्त दरीतल्या वाऱ्याच्या घुमण्याचा आवाज येत होता.
    "आपण निघायचं का त्यांना पाहायला? "ती पाईंटकडे येणाऱ्या वाटेकडे पाहून म्हणाली.
    "मलाही तसंच वाटतंय. " तोही तिकडे पाहून म्हणाला.
    "पण नको. चुकामूक झाली तर? "  ती.   
    "थांबू. येतीलच ते पाच मिनिटात. इथेच पलीकडे आहेत. " तो.
      या वाक्यानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.
     "घ्या दाणे. "
     "थॅंक्स. बाजार मस्त आहे ना इथला? "
     "स्वस्त मिळतात वस्तू"
     "स्वस्त आणि मस्त. "
     "माझ्याकडे होताच कॅमेरा. पण बाजारात हिंडल्यावर आणखी एखादा छोटा घ्यावा, असं वाटलं. "
     "काढला एखादा फोटो सनसेटचा? "
     "नाही. जो पाहत बसलो तो.. "
     "माझंही असंच होतं... "
     "पण मी़ डिजिटलवर जरी काढले फोटो तरी अल्बम करतोच त्याचा. " 
     "अहो, अल्बमशिवाय मजाच नाही. "
     "करेक्ट. अगदी हेच माझं मत.
    ..... नातेवाईकांकडून आलं होतं स्थळ? "
     "नाही. यंदा कर्तव्य डाट काम वर नोंदवलं होतं. "
     "कमाल आहे, मी पण तिथेच--"
       हे तो अशा सुरात म्हणाला की ती त्याच्याकडे पाहात राहिली.
     "म्हणजे, केव्हा नोंदवलं होतं..? "तो.
     "झाले, तरी सहा महिने झाले असतील. "
     "मीही तेव्हाच.. " तो विचारमग्न.
     "कसला विचार करताय? "
     "काही नाही, काय काय अपेक्षा दिल्या होत्यात? "
     "का हो..? "
     "मी 'फोटोग्राफीची आवड आहे. जोडीदाराला असल्यास उत्तम'. असं दिलं होतं. "
     "मी असं काही दिलं नव्हतं. पण फोटोग्राफीची आवड आहे, असं दिलं होतं.
     "फक्त फोटोग्राफी..? ".
     "बऱ्याच गोष्टी. आवडती डिश, आवडतं अत्तर.. "
      
      दरीतल्या वाऱ्याचा आवाज जरा जास्तच वाढला होता.
      संवाद थांबल्यासाऱखा झाला. भोवती जरा गलका झाला. बरीच जोडपी कठड्यापाशी आली.
      
     आपोआप दोघांची दृष्टी मावळणाऱ्या सूर्याकडे वळली. त्याने एक फोटो काढला. नकळत तो कॅमेरा त्याने तिला दिला. तिनेही तेच दृष्य टिपून घेतलं. बिंबाच्या वर पसरणाऱ्या केशरी रंगाकडे दोघेही पाहात बसले. दोघांपैकी कोणीच पुढे बोललं नाही. काही उपयोगही नव्हता.
      
                                                                                           
                                                                                                                                           -  केदार पाटणकर