आभास की

आभास की -

             ''हे बघ आदित्य,तु ह्या वाडयात पहिल्यांदाच येतोस. तुला आधी हा वाडा दाखवतो. आतुन वाडा एकच दिसत असला तरी एट्रन्स दोन आहेत. कारण माझे बाबा म्हणजे तुझे आजोबा आणि त्यांचे भाऊ असे दोघेही पुर्वी ह्या वाडयात राहात होते. आधी हे अंगण,मग ही बैठकीची जागा. इथेच छान झोपाळा होता. आत प्रशस्त तिन तिन रुम्स,वरच्या मजल्यावर ही तशाच खोल्या,मागे स्वयंपाकघर. मग परसदार म्हणजे ही मोकळी जागा व त्या कोपऱ्यात टॉयलेट्स. ही बघ सर्व वाडयाभोवती मनुष्यभर उंचीची भिंत आहे. अरे आम्ही लहान असतांना ह्या अंगणात केवढे खेळायचो. त्या कोपऱ्यात बोराचे मोठे झाड होते. लगोरी,सुरपारंब्या,कितितरी खेळ खेळायचो. जे आता तुम्हाला नांवानेही माहीत नाहीत. लगोऱ्यात तर माझा काय नेम होता''.

             ''अरे बाबांच काय एकतोयस, त्यांचा नेम म्हणजे न......'' आई म्हणाली.

             ''अरे तुम्ही जरा आवरतायन-''

             ''का ,आता विषय का बदलता? अहो गेल्याच वर्षी आम्ही मुंबईत जुहूला गेलो होतो. तिथे ते रिंग टाकायचा खेळ असतो न,म्हणजे सर्व वस्तु अशा समोर ठेवलेल्या असतात,त्यावर बरोबर रिंग पडली की ती वस्तु आपली. तिन वेळा पैसे देऊन ह्यांनी रिंग विकत घेतल्या पण साधी एका वस्तुवर रिंग पडेल तर शपथ.

             ''नाही पण लहानपणी ह्याचा नेम चांगला होता. आता चष्म्यामुळे-

             ''दादा-माझी चेष्टा करतोस?आता तुझ सांगु का?''

             ''काय-काय माझ काय-"

             ''ते समोर झाडावर लटकत होतासऱ्हिरोसारखा गाण म्हणत आणि जो धापकन पडलास"

             ''हो बाबा त्यावेळेला पडलो खरा. पाय बचावला . पण तेव्हा कुढे माहीत होत की आता वाचला तरी पुढे तो जाणार आहे म्हणून''.

             ''अरे म्हणजे मला तस नव्हत म्हणायच''

             अरविंद देशपांडे चाचरतच म्हणाला.ह्या वाडयात काही वर्षांपर्यंत अरविंदाचे मोठे भाऊ विकास देशपांडे राहायचे. हा वाडा जुन्नरला कित्येक वर्षांपासून आहे. अरविंद व त्याचा चुलत भाऊ अभय कॉलेजच्या निमित्ताने पुण्यात गेले.  शिकुन तिथेच नोकरी करुन सेटल झाले.  विकास आर्मीत कर्नल होते.  त्यांच कुटुंब, मुल तिथेच वाडयावर रहात होती.  काश्मिरमध्ये असतांना काही वर्षापूर्वी एका स्फोटात त्यांचा पाय गेला.    आर्मीतुन रिटायरमेन्ट घ्यावी लागली. आता जयपुर फुट लाऊन चालतात. त्यांना मुंबईत एक चांगली नोकरीची ऑफर आल्याने ते सर्वजण मुंबईत शिफ्ट झाले. त्यामुळे वाडा बंद पडला.  कधीतरी कुणी वाडयात म्हणून यायचे. पण आल्यावर साफसफाई करता करता नाकीनऊ यायचे.  त्यामुळे सर्वांचे येण हळुहळु कमी झाल.  पडझड व्हायला लागली.  त्यामुळे जेव्हा वाडयाच्या अर्ध्या भागात एका खाणावळवाल्याने खाणावळ चालू करण्या करता विचारले तेव्हा सर्व भावांनी मिळून होकारच दिला.  कारण एकतर पहिल्या पासून वाडयाचा अर्धा भाग बांधतानाच वेगळा केलेला होता.  शिवाय देखरेख राहील, वाडयात जरा जाग ही राहील, ह्या कारणाने तिथे खाणावळ सुरु करण्यास परवानगी दिली.  महिन्या भरापूर्वीच सर्वांना वर्तमानपत्रातुन वाचनात आले होते की, तिथल्या शाळेने आवाहन केल होते की शाळेला 60 वर्षे पुर्ण होत आहेत.  तेव्हा जुन्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या ह्या तारखेस जरुर यावे.  स्नेह संमेलना सारखा कार्यक्रम ठेवला आहे.  पुण्यातल्या  दोघा भावांनी मुंबईच्या विकासच्या फॅमिलिला पुण्यातच बोलावून घेतले.  आपापल्या गाडया नेण्या एवजी एक 17 सिटर बसच केली, की जेणे करुन सर्व एकत्र असतील.  त्यामुळे येतांना गप्पा, गाणी ,जोक्स ह्यांना तर उत आला होता.  वाडयात खाणावळवाल्यास निरोप दिला होता की वाडा जरा आवरुन स्वच्छ करुन ठेवा म्हणून.

             ''साहेब ह्या एवढयाश्या रोडवरुन ही बस आत कशीबशी जाईल पण पुढे टर्न करता येणार नाही''.

             ''अरे म्हणजे आम्हाला इथेच सोडतोस की काय ? एवढे चालत जायचे ?''

             ''अरे बॅगा घेऊन चालत जाऊ , एवढ काय, थोडा व्यायाम नको का?''

           हो नाही करता करता गाडी गावाच्या सुरवातीला एके ठिकाणी पार्क केली .

             ''तुझ्याकडे मोबाईल आहे न, रात्री 8।। वाजता जेवायला वाडयावर ये, मोबाईल करायला लाऊ नकोस."

             ''होय साहेब'', ड्रायव्हरला बजावून तिघे भाऊ, त्यांच्या बायका व तिघांची मिळून 5 मुल, सर्व लटांबर वाडयावर आले.

             ''दादासाहेब, जेवायला येताय न ?''

             ''अरे वा जेवण तयार आहे ?''

             ''हो मुद्दाम चांगले द्रोण आणि पत्रावळी मागवल्याय ,चला'' खाणावळवाल्या भाऊनी सांगितले.झुणका, भाकर, चटणीचा ठेचा, कांदा, भात असा जेवणाचा बेत होता.  जेवण झाल्यावर परत गप्पांचे अड्डे सुरु झाले.

             ''आम्ही तिघांनीही ठरवुन लेंगा झब्बा आणला आहे.  तुम्हीही सर्वांनी तेच घालायचे आहे, हे घ्या !''

             ''अहो पण कार्यक्रमाला तुम्ही जाणार आहात न. मग  आम्ही का म्हणून हे घालायचे ?'' मुलांचा गल्ला.

             ''जैसा देश वैसा भेस, इथल्या सारख वाटल पाहिजे म्हणून''.

             ''मग डोक्यावर एक दादा कोंडके स्टाईल टोपीही द्यान., अरे हे सर्वजण दिवसभर कार्यक्रमाला जाणार मग  आपण सर्वांनी कुठे जायच ?''

             ''आपण अस करु सकाळी लवकर उठून -

             ''लवकर का म्हणून ?''

             ''अरे बर सकाळी उठून - उठणार न सकाळी ? तर सकाळी उठून आवरुन शेजारी नाश्ता करुन लेण्याद्रीला जाऊन येऊ. कितीतरी वर्षापासून तिथे जायच राहतय."

             ''लेंगा झब्बा, टोपी घालून ?''

             ''अरे देवाला जाण महत्वाच कि दिसण ?''

            " चला आता लौकर झोपा बघु, सकाळी आम्हाला लौकर उठून शाळेत जायचय''.

             ''लेंगा झब्बा घालून''

             ''हो हो तेच ते अरे पोरांनो काय अस करता.  कधीतरी जिन्स, टी शर्टच्या एवजी हे ही वापरुन पहान ?''

             अस गप्पा मारता मारता एक एक जण आडवा होऊ लागला.  शेजारी खाणावळवाल्याकडची जाग ही थांबली. इतका वेळ त्यांचा भांडी घासण्याचा, भांडी धुण्याचा आवाज येत होता  तोही थांबला .

             ''वहिनी अहो वहिनी - एकदा मागे जाऊन येऊयात का ? अहो अस बाथरुमला रात्री बाहेर एकटयाने जायला भिति वाटते''

             ''तुम्ही जाग्या आहात ? अहो माझ्याही मनात तेच होते''

             ''चला मग आपण जाऊन येऊ ? किती वाजलेय हो."

             ''बॅटरी इथेच ठेवली होती.  2।। वाजलेत चला सावकाश हं, ह्यांना उठवू का ?

             ''अहो ह्या इथल्या कडी कोयंडयाचा आवाज आला न की आपोआप जाग येईल त्यांना."

             ''काय हो, मागे जाउन आलात कां ?"

             ''म्हणजे तुम्ही जागेच आहात मग बरोबर यायच नाही का ?''

             '' अग ह्या वाडयातच जायला भिति कसली ?''

             परत दोघींच्या खुसुखुसु आवाजात गप्पा सुरु झाल्या. दहा पंधरा मिनिटात परत दोघींचा डोळा लागला.

             ''खण खण खण'' बाहेरील दारावर कडी आपटल्याचा आवाज आला.  सर्वजण गाढ झोपेत होते.

             ''खण खण खण खण'' परत बाहेर दारावर आवाज.

             ''अहो कोण आलय बाहेर या वेळेला उठा न."

             ''आत्ता या वेळी कोण ?''

             इतक्यात मागच्या दारावरही लोखंडी कडीचा आवाज यायला लागला.

             ''अरे बापरे हे काय आत्ता तर समोरुन आवाज येत होता. इतक्यात मागे दोन्हीकडून, कोण आलय ?"

             ''थांबा घाबरु नका मागच दार  उघडू नका'',

           परत पुढे खण खण आवाज , दोन सेकंदात मागे.

           "  अरे काय भुताटकी आहे की काय ? कोण बोलत नाही नुसते आवाज येतात.  थांबा रे मीच जाऊन बघतो."

             रात्री झोपतांना बाजूला काढून ठेवलेला जयपुर फुट लावत लावत विकास काका म्हणाले.

            " अहो तुम्ही एकटे पुढे जाऊ नका."

             ''थांब ग काही होत नाही", म्हणत तेच आधी पुढे गेले. खर तर मध्ये अंगण, वाडयाच्या चौफेर जि भिंत होती त्याला असलेल दार.  ते तर खर नांवालाच उरले होते.  जोरात धक्का मारुन कुणीही आत येऊ शकत होता.  आधी विकास काकांनी दाराच्या असलेल्या फटीतून बाहेर पाहील.  बाहेर कुणीही दिसत नव्हता.  आता सर्व पुरुष मंडळी बाजूला उभी राहिली व त्यांनी दार उघडल. बाहेर कुणीच नव्हत.

            ''चोर असेल कां ?''

             ''चोर असेल तर तो काय दार वाजवून येईल''

             ''अरे चोर कशाला येईल. इथे खाणावळ आहे म्हणून तर कुणी आला नसेल आणि चुकुन बाजूच्या एवजी आपल दार वाजवल असेल.''

             ''रात्री तीन वाजता का कुणी जेवायला येत ?''

             '' म्हणजे मला कळेना क्षणात पुढे आवाज तर क्षणात मागे. भुताटकी सारखच''.

             '' कितितरी वर्षांनी तुम्ही तिघे भाउ इथे एकत्र आलात म्हणून पितर तुम्हाला बघायला आली असतील''.

             ''म्हणजे भुत ?''

             ''भुत नाही रे आजोबा, पणजोबा ,खापरपणजोबा अस कुणी तरी''

             ''आयला काय सॉलीड आहे न, म्हणजे आपले पुर्वज ?''

             ''कधीपासून मी सांगेन म्हणते.  पण आता ही गोश्ट झाली म्हणून सांगते. हा आदित्य व्हायंच्या आधीची गोष्ट ., हा आदित्य होणार हे ही मलाहि माहीत नव्हत.  पण तेव्हा माझ्या स्वप्नात एक आजोबा यायचे. झुपकेदार मिशा, मुंडास. एकदा मला म्हणाले तुझ्या घरी यायचय येऊ ? मी त्यांना म्हटले आत या नं पाणी देते.  आत बसले.  मलाच नमस्कार केला त्यांनी .त्यानंतर मी हे सर्व विसरुनही गेले होते.  खर तर कधीतरी  मी या वाडयात आले होते.  पण इथल्या ह्या शंभर फोटोंच्या तस्बिरी कधी लक्ष देऊन पाहिल्या नाहीत. पण आज संध्याकाळी त्या बघतांना ही तस्बीर - हा - हा फोटो आहे न तो कुणाचा आहे?."

             ''ते माझे आजोबा म्हणजे आदित्याचे पणजोबा''

             ''हाच, असाच चेहरा होता त्यांचा .तेच माझ्या स्वप्नात यायचे. पण मला  त्यांची भिती नाही वाटली.  आताही वाटत नाहीये''.

             ''बापरे म्हणजे - पणजोबा आदित्याच्या रुपात परत आलेत की काय ? "

             आणि मग भुत, गुढ कथा ह्यावर चर्चा सुरु झाली.

            " अरे झोपा बघु सर्वांनी आम्हाला उद्या सकाळी शाळेत जायचय."

             ''लेंगा झब्बा घालून''

             ''हो हो सारख सारख ते काढु नका''

             ''एकदा तरी घालु नका बोला न''

             ''झोपा आता''

             4।। होऊन गेले होते.  परत सर्वजण आडवे होऊ लागले. आदित्यला  झोप येईना.  आई हे काय म्हणाली, म्हणजे मी - मी माझ्या पणजोबांच रुप आहे ? पण त्यांना तर भरदार मिशा आणि मी , हँ  मोठे झाल्यावर येतील म्हणा, पण म्हणजे हे शरीर माझ आणि आत्मा त्यांचा.  अस कस शक्य आहे .अस म्हणतात की काही इच्छा अतृप्त राहिल्या असतील तर माणूस पुन्हा जन्माला येतो.  तस बघीतल तर आता माझ्या सर्व इच्छा पुर्ण झाल्यात, आता मी मेलो  तरी हरकत नाही असे म्हणणारे किती असतील ? प्रत्येकाच्या काहीना काही ईच्छा तो मरतांना ह्या अपुर्ण रहात असतीलच.  मग प्रत्येक जण अस कुठे आपल्या पुढल्या पिढीत जन्म घेतो ?  का येत असतील पण अस कुणी स्वप्नात येऊन सांगत नसतिल ? माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात तर अस काही एक्सेश्पनल झाल नाही की मला वाटेल हो - ही पणजोबांची  राहिलेली इच्छा असेल ती आता पूर्ण झाली . पण पुढे  काही घडणार असेल .पण माणस भुताला का घाबरतात ?

             आता शिर्डीचे साईबाबा किंवा शेगावचे गजानन महाराज ह्यांनी समाधी  घेतल्यावरही ज्यांना दर्शन दिले आहे ति माणसे आनंदाने हर्षोन्मिलित होतात मग जेव्हा आपण भुत म्हणून कुणाही माणसाच रुप बघतो तेव्हा ति भितीने गर्भगळीत का होतात ? ती काय आपल्याला त्रास द्यायला येतात ? असा विचार करता करता आदित्याला कधी डोळा लागला कळलेच नाही.

             सकाळी उठल्यावर सर्वांचे आवरुन झाल्यावर नाश्ता करता करता खाणावळवाल्याकडे रात्रीचा विषय निघाला.  त्याला तर आश्यर्यच वाटले.  त्याला तरी अजुनपर्यंत असा कधी अनुभव आला नव्हता.

             तिघे काका नंतर शाळेत गेले.  बाकीची सर्वजण बस घेऊन लेण्याद्रीला गेले.

             ''आई डोंगरावर चढतांना वाऱ्याने हा लेंगा सारखा पायात अडकतोय''

             ''मग असा थोडा फोल्ड करुन वर घे''.

             ''फोल्डच करायचा होता मग मी शॉर्ट घातली असती तर काय बिघडल असत ?''

             ''एक दिवस तर घालायचा .किति तुम्ही सर्वजण कटकट करता रे."

             ''काकु उन लागतय. टोपी आणलीस तर दे ना."

             ''घे बाबा, तुम्ही सर्वजण नं....''

             दुपारी सर्वजण जेऊन परत आडवे झाले .परत सर्व गप्पांना उत, संध्याकाळी शाळेतला कार्यक्रम संपवून तिघेही जण वाडयावर आले.  मग तिथले विषय, बरोबरचे मित्र आता कोण कुठे आहे ,काय करतोय ह्याच्यात रात्र कधी झाली कळलच नाही.

             ''दादासोब येता न जेवायला ? रात्रीचे 9 वाजलेत''.

            " आम्हाला एवढी भुक नाही , पण आलोच थोडया वेळात."

             "अरे आपला ड्रायव्हर का नाही आला अजून .लाव त्याला मोबाईल."

             ''आई मोबाईल लागत नाही ''

             ''मग त्याला बोलावून आण जा. आणि हे बघ तु एकटा नको जाऊस. तुम्ही तिघे जण बरोबर जा.  बॅटऱ्या बरोबर घ्या. इथल्या इलेक्ट्रिसिटीचा भरोसा नाही.  आणि निरोप देऊन लगेच परत या''.

             आदित्य त्याच्या दोन भावांसह निघाला.  रस्त्यावर मधेमध्ये कुठेतरी मिणमिणते दिवे होते.  मुद्दाम मोठयामोठयाने बोलत मध्येच टॉर्च मारत ते बसपर्यंत आले.  तेवढयात बसच्या मागून एक माणूस उठून चालत बाहेर आल्यासारखा दिसला.  त्याच्या पायातल्या वाहणाही करकरत होत्या.

             ''अहो तुम्ही इथे बसच्या मागे''

        ''का ? सरकारने  खुल्यावर मुतायला  बंदी घातली  काय ?'' तो तणतणच पुढे चालू लागला.  त्याच्या ह्या वाक्यावर सर्वजण जोरजोरात हसले.  एवढयात समोर रस्त्यावर दिव्याखाली एक म्हातारा माणूस अंधारातून पुढे आला.  झुपकेदार मिशा, वरती मुंडास, फक्त एकदा आदित्यकडे बघून हसला आणि त्या दिव्यांच्या प्रकाशात त्याची आकृति हळुहळु मोठी होत गेली.  क्षणार्धात ति आंभाळा एवढी होऊन आकाशात लुप्त झाली.  आमच्या हातातल्या बॅटऱ्या व लेंग्याच्या नाडया कधी गळून पडल्या कळलेच नाही.  हा दृष्टीभ्रम होता की खरच पणजोबा भेटायला आले होते ते प्रश्नचिन्ह मला अजून आहे.

     तुम्ही मला देऊ शकाल ह्याचे उत्तर?