मेघ नभी पांगले

मेघ नभी पांगले चंद्र हासला ।
कान्हासवे गोकुळी रास रंगला॥धृ॥
वेणू अन् टिपऱ्या चैतन्य पावल्या ।
अधिर साद घालिती गोपगोपिंना ॥
मेघ नभी पांगले...
यमुना जल लहरे कौमुदीसवे ।
सप्तरंग विखुरले गगन चमचमे ॥
मेघ नभी पांगले...
नंदनवन स्वर्गीचे ओस जाहले ।
झळाळत्या नभी पाहा देव दाटले ॥
मेघ नभी पांगले...
सा रे>गम् प ध नी सूर गुंजती ।
टिपऱ्यांच्या तालावर फुले हासती ॥
मेघ नभी पांगले...
झोप विसरले प्क्षी कलकल करती ।
मोर नाचती भंवती कोकिळ गाई ॥
मेघ नभी पांगले...
धेनु वासरांसवे घांवुनि आल्या ।
रास पाहण्यात की दंग जाहल्या ॥
मेघ नभी पांगले...
सप्तरंग लेवुनी अवनी सजली ।
लोट गोपिचंदनी उठती गगनी ॥
मेघ नभी पांगले...
वेणु फुंकितो सखा कृष्ण सावळा ।
शिर ठेवी स्कंधी कृष्णमयी राधा ॥
मेघ नभी पांगले...
रास खेळखेळता नवल वर्तले ।
गोपगोपि अवघे कृष्णरूप झाले ॥
मेघ नभी पांगले...