अस्पृष्ट

अदृष्टाने चेतनेला भिंती घातल्या घातल्या
किती जीवांच्या जीवांच्या पेशी कोंडल्या मांडल्या॥

किती चिरेबंदी जीव कसे हालती बोलती
मीच बोलतो हालतो- मिजासही मिरवती॥

मर्त्य जीवाला कायेचे एकसारखे लिंपण
आत काय काय चाले--जीव राहतो अजाण॥

झाड-किडा-मुंगी-नर असेना का जनावर--
कसा चेतनेशिवाय व्हावा तयांचा जागर॥

जाणिवेत सामावले तेच स्थूल भासे स्पष्ट
इंद्रियांच्या पल्याडचे-- सूक्ष्म दूरचे-- अस्पृष्ट॥