तरू वाढण्याला मुळे खोल जाती
मुळांच्या नशीबामधे फक्त माती
तरूच्या डहाळ्या पुन्हा येत खाली
स्वतःच्या मुळांशीच करतात नाती
मुळे आपली पाहताना.... डहाळी
मनी जाणते 'मी नसावे निराळी'
कटू सत्य लक्षात येते तिच्याही
अता ना नव्हाळी, अता ना झळाळी
तसा प्रश्न इतकाच आहे खरा तर तरूने जमीनीवरी काय केले
किती पाखरांना सहारा दिला अन लतांना किती उंच व्योमात नेले
फुलांनी सुगंधास ओसंडले का, फळांनी भुका शांत केल्या कितींच्या
कितींना तरू सावली देत होता, किती सुखविले 'जन्म ओसाडलेले'
असे जे न होते, मुळे होत अंती, निघाले दुज्या बाजुने या धरेच्या
निघाले जसे त्यांस लक्षात आले किती क्रूर अंगात थट्टा धरेच्या
इथे कोण माणूस घालेल पाणी? इथे तर मुळी जीवसृष्टीच नाही
इथे वाळवंटेच दृष्टीस पडती, चुका आपल्या या, चुका ना धरेच्या
वळावे पुन्हा मी प्रवासास आता
निघावे मनाला सुधरण्यास आता
नको हे पुन्हा वाळवंटात येणे
करावे सुखी सर्व विश्वास आता
......करावे सुखी सर्व विश्वास आता