पाउस असा ...

पाऊस असा रिमझिम
झाडांची ओली पाने
प्राणांच्या ओंजळीत
बरसती थेंब आठवांचे  ।

पाउस असा रिमझिम
आसमंत भारलेला
ऱ्हुदयी लखलख झुंबर
अन् प्रकाश साचलेला ।

पाउस असा रिमझिम
दाटलेले मेघ काळे
मन्मनी जपल्या कुपीत
दर्वळती  गंध आगळे ।

पाउस असा रिमझिम
हळुवार तो वारा
गात्री खोल भिनलेला
बासरीचा सूर दीवाणा ।

पाउस असा रिमझिम
रंगलेली ओली धरती
वेदनेच्या अथांग नेत्री
येती सरीवर सरी ।

पाउस असा रिमझिम
धूसर धूसर दिशा
बरसत्या जलधारेत
मिसळे थेंब अश्रू चा ।