डेस्टिनेशन.....

डेस्टिनेशन.....

तुझं झोकून देणं कायमचंच. या प्रशच्या पत्रातील वाक्यावर थांबले थोडीशी.. गुंतण.. झोकून देणं हे उत्स्फूर्त भाव आहेत माझे... पाय जरा लांबवले खूप थकावा आलाय जराशी लोळण घ्यावी म्हणून
सैलावले......

पण परत मन गुंतणे शब्दाशी जाऊन थबकलेच... गुंतले, झोकून दिलं मन माझंच आहे या भावनेतून. पण कितीसं माझं ते माझ्या स्वायत्त मालकीचं.. त्या गुंतण्यात अपेक्षा नव्हतीच का काही. असं तरी कसं म्हणता येईल मागणी होतीच ना.. मागणी नसतीच तर गुंतणं अडकणं झालं असतं शक्य.. कुठेतरी आतला शोध होता तो स्वत:च्या त्या शोधात सापडलेला एक दुवा होता तो.. सार काही इतक्या झटपट घडत गेलं ना आयुष्यात की त्यावर विचार करायला साधलाच नाही कदाचित विचार करण्या इतकी वैचारिक पातळी नसेल त्या त्या वेळी किंवा एखादी गोष्ट आता जशी पारखून घेते ती कुवत त्या वयात नसेल.. हा दोष वयाचा होता की अपरिक्वतेचा.. नाही माहीत पण झपाटले पण गुंतणं हे जसा माझ्या मनाचा अविभाज्य भाग झालाय... एक एक पापुद्रे काढून आत आत गेलो की प्रत्येक पापुद्र्याचा रंग वेगळा... खूप वेगळा. कधी समजणारा तर कधी न कळणारा.. तरीही त्याच्या वेगळ्याच पैलूने खुणावणारा.

कालांतराने रंग फिका होतो विटतो ते मनाच्याही रंगाबाबतीत खरंय? आज इथे एकटी बसून विचार करतेय.. खरंच विटलेत का ते रंग?.. नक्कीच.. नाहीतरी नव्या नव्या दिवसात नव्हाळीच्या.. त्याच्या बरोबर निलच्या बरोबर अनुभवलेले ते रंग किती टवटवीत.. किती प्रसन्न होते.. उन्हाने रंग विटत जावा.. तसा नात्यातला तो रंग गहिरा होण्या ऐवजी विटत गेला. त्याला जीर्ण विटकेपण येता येताच हातात आला प्रश च्या अस्तित्वाचा धागा.. तो सहज आला हातात की भरकटलेल्या मनाची अवस्था होती ती? शोध होता? कुठला तरी धागा हातात लागेल असा.. नाही पण हे असे काही घडेल हे मनी ध्यानी नव्हते माझ्या अन प्रशच्याही... किती सहज आलो संपर्कात.. अगदी सरळ पण.. कसे गुंतत गेलो.. नाही आठवतं.. हे गुंतणं झपाटलेपण तेव्हाही असच उसळून आला होत वर.. भुईकमळासारख मनाच्या गाभ्यातून उमललेल.. नाहीतर दोघही बद्ध असताना संसार मागे असताना हे असे अडकलेपण एकमेकांत कसे घडले... तेव्हाचे गुंतणे झपाटणे वेगळे होतेच कुठे असेच होते. माझ्या मनीच्या सहजभावासारखे.

एक शोध होता का तो की आतल्या पापुद्रयाला काय हवंय त्याचा.. पण संपला कुठे तो शोध.. स्वत्व गवसण्याचा शोध अजून ही चालूच आहे.. परवा हे प्रशच पत्र आलं किती वरवरच वाटलं.. माझ्या आतला कल्लोळ त्याला कळलाच नाही की त्याची बाकीची आवरणे इतकी घट्ट झालीय की मी नाही पोचू शकले आतवर? मी पोचण्यात कमी पडले की प्रश.. मला जे हवंय ते तेव्हा याला अचूक कळाले होते मग आताच कसे कळत नाही.. की न कळण्याचं हा देखावा आहे.. वर वर लिहितोय किती.. माझा जॉब.. त्यातले टेन्शन्स.. जबाबदाऱ्या.. अन शेवटी एक वाक्य हे सगळं तुझ्यामुळे?.. मी काय केलं.. काहीच नाही.. हे वाक्य तो कदाचित बायकोलाही बोलला असेल? असेच.. छे हा आजवर कधी मनात न आलेला प्रश्न आता येतोय का? पण तू कशी आहेस या पलीकडे माझ्या मनाची तडफड कधी जाणवली नाही त्याला. इतकं खोलवर जाणतोय म्हणताना हे इतकं वरवरचं.. कशी आहेस? आराम कर मजेत राहा.. झोकून देणं कायमचंच आहे तुझं पण स्वतःला जप. बस.. इतकंच.. माझ्या अंर्तमनातला कोलाहल नाही जाणवत त्याला?

प्रशला मी आकाश समजले.. मी जिथे जाईल तिथे माझे आकाश बरोबर असेल माझ्या असे.. अन नील माझी जमीन होता माझी पावलं स्थिरवणारी.. मग मी जमिनीवर ही स्थिरावले नाही अन आभाळात पण नाही.. त्रिशंकू अवस्था सगळी.. जिथे गेले तिथे आभाळ होते बरोबर डोक्यावर कधी तापणारे तर कधी कोसळणारे. कधी वांभळ आलेले तर कधी काळोखे.. अन जमीनही तशीच कधी खडकाळ तर कधी मऊसूत. कधी ओली किच्च तर कधी भेगाळती.. मला जमले नसावे त्या आकाशा बरोबर अन जमिनीबरोबर राहायला

त्या त्रिशंकू अवस्थेतून निघायला आले या आदिवासींमध्ये... त्याला सोडून इथवर येताना नव्हता आला कधी तेव्हा मला माझा शोध घ्यायचाय.. माझा स्वत:चा शोध हा एकच विचार.. कदाचित असे असेल नवऱ्यांतून नीलमधून सुटायला.. प्रशचा आधार मिळाला.. खूप गुरफटते मी खूप.. स्वत्व विसरून पण गंमत अशी की विरघळतही नाही पूर्णं मग तशीच भिजत राहते पण कुजण्या आधी परत जाग येते आपण भिजतोय हे जाणवते अन मग पुन्हा प्रवास नवीन गुरफटण्याचा...

हे सार लहानपणापासून असच.. चित्राचा नाद सोडायला गाणं जवळ केलं अन गाण्यातून बाहेर पडायला लिखाण.. हे आता सगळंच इतकं लांब गेलंय की कधीकाली मीच होते ती ते वाटण्या पलीकडे.. आज माझ्या कडे बघून या कोणाला वाटणार नाही की एके काळी ही बाई गाणं गात असेल किंवा चित्र काढत असेल नाहीतर कविता तरी.. पण इथवरच प्रवास बघितला की वाटत इथे येण्यासाठी हे टप्पे अपरिहार्य होते.. नाहीतर तशी मी आज इथे या आदिवासी पाड्यावर नसते येऊन राहिले त्यांच्यातली एक होऊन.. आतल्या ऊर्मी मला स्वस्थ बसू देत नव्हत्या म्हणून मी त्या शोधात अडकत होते आजवर वाटेतल्या या टप्प्यावर.. इथे यायच्या त्या पायऱ्या होत्या माझ्यासाठी.. मी इथे आलेले प्रशला ही आवडले नाही अन नीललाही... पण माझं अटळ होत येणं...

त्या भिरभिरत्या काळात अध्यात्माकडेही वळले बरीच पण त्या अध्यात्मातच उमगलं मला माझा लास्ट डेस्टिनेशन हे असय.. सेवा अन दुसऱ्यांसाठी झिजणं हेच खरंतर साध्य होत माझं आयुष्यभरीच.. आणि त्या साध्यातले नील. प्रश हे केवळ टप्पे होते.. हे माझा डेस्टिनेशन हे होत.. त्या झपाटलेपणाच गुंतण्याच झोकून देण्याच मुक्काम पोस्ट.. मुक्काम पोस्ट वरून आठवलं प्रशला नेहमी म्हणायचे माझ्या सगळ्या अपेक्षांचं, विचाराचं, कल्पनांच मुक्काम पोस्ट तू आहेस.. मजेत हसायचा तो तेव्हा.. मग कविता कर ह्यावर एक मुक्काम पोस्ट म्हणायचा..

अन नील तरी काय पहिल्यांदा माझ्या सगळ्याच विचारांचा स्रोत तोच असायचा अन प्रत्येक गोष्ट त्याच्या साठीच असायची पण जसं जसं उमगत गेलं की याच जग खूप वेगळं आहे याच ऑफिस, याच कर्तृत्व, मित्र मंडळी खूप काही यात माझा वाटा गृहस्वामिनीचा म्हणजेच घरापुरता.. घरा बाहेर याचा अन माझं संबंध नसायचा.. पण त्या नव्या नव्हाळीच्या कैफात कळलेच नाही.. की हे पूर्णत्व नाहीये... इतकं सीमित नाहीये जग खूप विस्तृत आहे.. खूप मोठं अन मग परत तो शोध मला स्वस्थ बसू देईना.. नील मग लांब लांब जायला लागला.. त्या पापुद्र्याचे रंग कधी विटायला लागले कळले देखील नाही... अन तोवर हा नवा धागा आला हातात प्रशचा.. धागा होता पण दोर वाटला तो.. प्रचंड उसळी मारून मनाने तो पकडला तेव्हा... तिथे शरीर पातळी गौण होती.. ते बंध होते मानसिक मनाचे.. केवळ मानस.. असोशीने जपले.. घट्ट धरून ठेवले उराशी... पण ते बंध ही कमकुवत आहे हे जाणवले तो क्षण होता खरोखर उसवून जायचा उध्वस्त व्हायचा...

त्या उध्वस्त क्षणातच हा दोर गवसला आदिवासी पाड्यांवर यायचा त्यांच्या साठी काम करायचा.. सगळा सगळा गुंता तसाच तोडून इथे निघून यायचा. आता शोधाच्या पायऱ्या संपल्या याची जाणीव देणारा अन एक शांतता स्थिरत्वाची देणारा..
टक टक

"कोण आहे? "
"बाई मी.. "
"काय रे तुकाराम? "
"बाई ते तात्या आन आप्पा आले तुम्हास्नी भेटाया.... "
"चल त्यांचे बघायचेय किती दिवसाच्या खेपा घालतेय मी आता काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच पाहिजे. "
पावलं तुकाराम बरोबर पडत होती पण मनातलं कल्लोळ थांबला होता माझं खरंच मुक्कामपोस्ट हेच आहे.. आताशी कुठे मिळाल डेस्टिनेशन मला.