मर 'बेफिकीर' आता

असण्यास रीत नाही
नसण्यास भीत नाही

येणे कह्यात नाही
जाणे मुठीत नाही

बोलेलही खरे ती
पण..... धडधडीत नाही

घडते बरेच काही
... नुसतीच पीत नाही

आयुष्य ताणणे बस
जे एक वीत नाही

ते सर्व पाठ झाले
जे जे गणीत नाही

झाले बरे म्हणा मन
पण खडखडीत नाही

तीही खुषीत नाही
मीही कुशीत नाही

कसले भविष्य त्याचे?
ज्याला अतीत नाही

वेगात धावतो मी
पण शर्यतीत नाही

मर 'बेफिकीर' आता
कोणास प्रीत नाही