**********************************
**********************************
तुझे भास किती.. आमंत्रणांचे आभांस किती
मनातल्या मृगजळाची आग्रही आरांस किती
लहरी मोगराही करतो सराईत ईशारे
गाण्यांतल्या कहाण्यांची मिजास किती
पहाटेचा प्राजक्त अन तुझे लाघवी सुगंध
स्वप्नांनीही पाहावी स्वप्नें असे मधुमांस किती
सुगंध वेचण्याचे हिशेब केव्हढे जीवघेणे
पहाटेच्या प्राक्तनात रात्रींचे वनवांस किती
लळा लावतो चंद्र पण हेळसांड तारकांची
नभाच्याही नशीबी ग्रहणें खग्रास किती
मिठीतल्या मंथनांची श्वासांनी केलीच चर्चा
विघ्ने सगुणा-निर्गुणाची या आत्म्यास किती
उत्सव तुझे न माझे ते खेळ अदभुतांचे
बिचाऱ्या आयुष्यांस अप्रुपाचे अदमांस किती
***************************************
***************************************
गिरीश कुळकर्णी
सप्टेंबर २००९