जसे जसे जमत गेले, तसे तसे जगत गेलो;
माझ्यातल्या 'मी' ला, मी सोयीस्करपणे विसरून गेलो.
आयुष्यात भेटणाऱ्या माणसांशी, निरगाठी मी बांधितं गेलो;
स्वार्थासाठी कुणाशी, दुश्मनी करणे विसरून गेलो.
आकाशाला कवेत घेण्या, उंच उंच झेपावीत गेलो;
पण त्या आधी पंखाच ,बळ मोजणं विसरून गेलो.
आयुष्यभर सांभाळली मी, पावलांखालची जमीन;
इतरांसाठी आयुष्य उधळताना , बाकी ठेवणे विसरून गेलो.
वेलीवरचे फुल सुगंधी, वेडावायचे मला नेहमी;
प्रौढत्वाचा बुरखा पांघरून; मी बालपण हरवून गेलो.
मला जमेल तसा मी, परमार्थ साधत गेलो;
पण संसाराची बंधन; तोडायची हेच विसरून गेलो;
आयुष्याच्या शेवटावर, जगण्याची आशा ठेवितं गेलो;
पण खरं सांगायचं तर आता, मी श्वास घेणंच विसरून गेलो.