ह्यासोबत
ईशान्य भारत व तेथील सात राज्ये याबाबत अन्य भारतीयांना फारच कमी माहिती आहे ही वस्तुस्थिती आहे. या भागाशी संबंध येण्यापूर्वी मी देखील असाच अनभिज्ञ होतो. माझ्या ऐच्छिक निवृत्ती नंतर काही समाजकार्य आपले हातून व्हावे या उद्देशाने आवडीच्या कामाचा शोध घेत असताना श्री सुनील देवधर यांचे ईशान्य भारत व तेथील समस्या या विषयावरील व्याख्यान ऐकण्याचा योग आला. अत्यंत प्रभावीपणे त्यांनी तेथील समस्या व तेथे कार्यरत असलेल्या सेवा भावी संस्था यांची इत्थंभूत माहिती सादर केली व तेथे आपली सेवा देण्यास इच्छुक व्यक्तींना येण्याचे आवाहन केले. मला त्यांना प्रतिसाद देण्याबाबत थोडाही विचार करावा लागला नाही कारण ते क्षेत्र मला नावीन्यपूर्ण वाटले.
पण मी तेथे काय काम करणार हा प्रश्न माझ्यासमोर होता. आयुष्याचे ३३ वर्षे मी बँकेत घालविले असल्याने अकाउंटीग हा माझा विषय होता व मी टैली या सॉफ्टवेअर वर सराईत पणे काम करत होतो. बहुतेक समाजसेवी संस्थांमध्ये या रुक्ष पण आवश्यक विषयासाठी माणसांची कमतरता भासत असते त्यामुळे माझी सेवा देखील तत्काल स्वीकारल्या गेली. आणि मी मेघालयातील सेवा भारती या संस्थेच्या कामासाठी शिलांग ला पोचलो.
मी करत असलेल्या कामाव्यतिरिक्त मी तेथील लोकांशी भेटण्यात व त्यांची संस्कृती जाणून घेण्यात माझा फावला वेळ घालवीत असे. आणि मग मी या भागाच्या प्रेमातच पडलो. मेघालयातील खेड्यात व तेथील लोकांत मिसळण्याची मला संधी मिळाली. नंतर मी आसाम व अरुणाचल प्रदेश येथेही भटकलो. त्या दरम्यान मी या भागाचा इतिहास आणि तेथील राजकारण यावरील पुस्तके वाचली. आणि मग हा विषय मला अधिकच जवळचा वाटू लागला.
भारताचा एक अभिन्न अंग असलेला आणि नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असा हा प्रदेश असा एकटा का पडला? खनिज संपतीने भरपूर आणि काश्मीर पेक्षा ही सुंदर अशा या प्रदेशाला अन्य भारतीयांपासून अलिप्त ठेवण्याचे काही विशेष कारण असावे का? या मागे काय राजकारण असावे? असे अनेक प्रश्न मला पडत गेले. त्यावर अनेक तज्ज्ञांनी केलेल्या समीक्षा माझ्या वाचनात आल्या. भारताशी केवळ ६० कि. मी इतकी सीमा तर बांगला देश, मिआन्मार, चीन व भूतान या देशांशी १६०० कि. मी. सीमा रेषांनी वेढलेला हा भूभाग. मग येथील लोकांना असुरक्षितता वाटत नसेल तरच नवल. त्यात ज्या भारत भूचे ते रहिवासी त्यांचेच दुर्लक्ष.
या लोकांना गरज आहे ती अन्य भारतवासियांनी त्यांना जवळ घेऊन आश्वस्त करण्याची. त्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांना तुम्ही आमचेच आहात याची कृतीने जाणीव करून देण्याची. आपल्या सुख सुविधा बाबत त्यांना माहिती करून देण्याची व त्यात त्यांचा सहभाग जास्तीत जास्त कसा राहील त्यासाठी प्रयत्न करण्याची. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील शहीद व्यक्तीचा सन्मान करून ते देखिल आपलेच होते व त्याचा आम्हाला अन्य क्रांतिकारकाप्रमाणे अभिमान आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याची. सेवा भारती, वनवासी कल्याण आश्रम, विवेकानंद आश्रम इत्यादी संस्था तेथे गेल्या ५०-१०० वर्षापासून कार्य करीत आहेतच पण जोपर्यंत संपूर्ण जनमानसात हा विषय रुजत नाही तोपर्यंत त्याला हवी तशी चालना मिळत नाही त्यामुळे ह्या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहणे आणि त्या दृष्टीने योग्य ती कृती सामूहिकरीत्या करणे फार गरजेचे आहे. अन्यथा अरुणाचल वर चीन चा डोळा आहे तर आसाम कडे बांगला देशाची वक्र दृष्टी आहे. आपल्या नाकर्त्या वृत्तीमुळे हा संपूर्ण भूखंड आपल्या देशापासून इतर देश गिळंकृत करण्यास मागे पुढे पाहणार नाही.