ईशान्य भारताशी असलेले आपले पौराणिक संदर्भ

ज्या प्रांताशी आज आपला फार क्वचित संपर्क आहे तो भाग व तेथील लोक पूर्वी आपल्या जीवनशैलींशी व महाभारत व पौराणिक पात्रांशी किती घनिष्ट संबंधित होते हे खालील माहिती द्वारे जाणून घेणे उद्बोधकं ठरेल.

गुवाहाटी शहराचे जुने नाव प्राग ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसवल्याचा उल्लेख पुराणात आहे. आजचा आसाम पूर्वी कामरूप प्रदेश म्हणून ओळखला जात असे. दक्षाने शिवपत्नीचा केलेला अपमान सहन न झाल्याने तिने केलेले आत्मदहन व त्यातून क्रोधित झालेल्या शंकराने हाती सतीचे शव घेऊन केलेले तांडव नृत्य पाहून पृथ्वी भयभीत झाली. विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे केले व ते तुकडे जेथे जेथे पडले ती एकावन्न स्थाने शक्तिपीठे म्हणून भारताच्या चारी दिशांना पसरलेली आहेत. गुवाहाटीतील 'कामाख्या' (कामाक्षी) देवीचे शक्तिपीठं हे त्यापैकीच एक आहे.उषा व अनिरुद्धाची प्रेमकथा आसामच्या तेजपूर मध्ये घडली होती. आसाम वर ६०० वर्षे ज्या आहोम राजांनी राज्य केले ते स्वतःला स्वर्गदेव म्हणवत. त्यांच्या जुन्या ग्रंथानुसार ते इंद्राच्या मोठ्या भावांची संतती आहेत. आसामच्या डोंगराळ कारबी आंगलांग जिल्ह्यातील कारबी समाज स्वतःला सुग्रीवाचे वंशज मानतो.

अरुणाचल प्रदेशात परशुरामाने आईच्या रक्ताने माखलेला परशू धुण्यासाठी खडक फोडून जो जलप्रवाह चालू केला त्याचा पुढे ब्रम्हपुत्र नद झाला. अरुणाचल प्रदेशाच्या लोहित या जिल्ह्यातच रुक्मिणीचा पिता भीष्मक याची भीष्मकनगर ही राजधानी होती. तिचे अवशेष अजूनही तेथे सापडतात. रुक्मिणीचे हरण करून तिला द्वारकेला नेताना काही काळ श्रीकृष्ण अरुणाचल च्या सियांग जिल्ह्यात थांबला होता असे स्थानिक लोक अजूनही मानतात.मेघालयातील खासी स्वतःला एकलव्याचे वंशज मानतात व त्यामुळे ते धनुष्यबाण चालवताना अंगठ्याचा उपयोग आजही करीत नाहीत. मेघालयातील जयंतीया जमातीत जुळी मुले झाल्यास त्यांची नावे 'राम-लखन' व जुळ्या मुली झाल्यास 'दुर्गा-गंगा' ठेवणे हा परंपरागत नियम आहे. भीमाने ज्या हिडिंबेशी विवाह केला ती नागालैडची होती. नागालैडचे आजचे जे दिमापूर शहर आहे त्याचे मूळ नाव 'हिडींबापुर' असे होते. मणीपूर ची राजकन्या 'चित्रगंधा' हिचेशी अर्जुनाने विवाह केला होता. त्रिपुरावर सुमारे दोन हजार वर्षे माणिक्य वंशाचे राज्य होते. त्यांनी बांधलेली मंदिरे व बुद्धविहार एकात्मतेची साक्ष देतात. वरील ऐतिहासिक उल्लेखावरून ईशान्य भारतातील सात राज्ये हजारो वर्षांपासून उर्वरित भारताशी किती समरस होता याची साक्ष पटते.साभार-सुनील देवधर यांचे पूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन वरून.