हिरवा साज

रिमझिम बरसतो सखा साजण पाऊस
साज घेऊन हिरवा, येतो साजण पाऊस

तिची प्रतिक्षा ओलेती अन सखा ही आतूर 
पानापानात शहारा, कणाकणात अंकूर

हिरवाईचे डोहाळे तिचे पुरवतो सखा
खुळावते राणी कशी साज लेऊन अनोखा

मिरविते नवा शालू भरजरी तो हिरवा
प्रेमसरीत भिजूनी चढे रंग गाली नवा

मेघ दाटती नभात तिचे बघण्या कौतुक
हलकेच उतरती, घेती चुंबन नाजुक

तीट लावियतो गाली, वारा हळूच वाकून
शेला फुलांचा रंगीत, धरा घेते पांघरुन

जयश्री अंबासकर