ऐरण

समजुनी बसलाय ऐरण माणसाला
देव भेटे होउनी घण माणसाला

रोजची आहे लढाई भाकरीची
रोजची पोटार्थ वणवण माणसाला

जू असे मानेवरी, ओझे शिरावर
वेतनाचे शुष्क वैरण माणसाला

स्वच्छ ठेवा, स्वच्छ ते सांगेल सारे
आपले मन हेच दर्पण माणसाला

ब्रह्मकमळासारखी त्याची प्रतीक्षा
सर्जनाचे मोजके क्षण माणसाला

अस्वलाला नाचवी दरवेश जैसा
दैव बांधे चाळ-पैंजण माणसाला