तू भेटली नाहीस तर मग भेटते डोकेदुखी
अगदी तुझ्या मर्जीप्रमाणे वागते डोकेदुखी
जेव्हा घरी मी पोचतो अन पाहते आई मला
आईस मीही पाहतो अन संपते डोकेदुखी
रस्त्यामधे कोणी मधे येते जणू राहू, शनी
कर्कश्श आवाजात 'डोकी' बदलते डोकेदुखी
शाळेत हल्ली या जगाच्या दप्तरे ही केवढी
स्पर्धा, असूया, शर्यतींना वाहते डोकेदुखी
जातेस तू सोडून तेव्हा दुःखसुद्धा वाटते
आनंदसुद्धा वाटतो की 'व्यापते डोकेदुखी'
कोणी मला 'ईर्शाद' म्हणुदे, ऐकुदेसुद्धा मला
पण दाद थोडीशी दिली की नासते डोकेदुखी
'बेफिकिर' गजलांना इथे पुसणार आहे का कुणी?
चिंता हवी दुनियेस, दुनिया मागते डोकेदुखी
- 'बेफिकीर'!