जरा घुश्शात आहे प्रेम बहुधा
तुझ्या-माझ्यात आहे प्रेम बहुधा
अबोला लांबला आहे जरासा
मुरवले जात आहे प्रेम बहुधा
हवा आली तुला स्पर्शून येथे
तिच्या लक्षात आहे प्रेम बहुधा
तरी निम्मे फुलवले मी कसेसे
तुझ्या नादात आहे प्रेम बहुधा
सलग ठोके कसे हृदयात आले?
जरा प्रेमात आहे प्रेम बहुधा
चिताही 'बेफिकिर' गंधीत झाली
तुझ्या श्वासात आहे प्रेम बहुधा