अश्रू
एकच खूण
अनावृत सत्याची
मनाच्या शिवमय होण्याची ॥
मनसागराला
जेव्हा येते भरती
अनावर होतात
भावनांच्या उत्तुंग लाटा
निखळून टाकतात
विवेकाचा किनारा
मग, अनावर उमाळा
आनंदाचा वा अनानंदाचा
तेव्हा जागृत होतात रोमरोम
अनुभवतात
शहाऱ्यांचे तरंग
कंठाचं अवरुद्ध होणं
गदगदणं
काळजाचं हेलावणं
मेंदूचं झणझणणं
गात्रांना सात्त्विकतेची जाग
आणि
चंद्रावर आलेल्या
मळभाचं विरणं
शीतल कौमुदीचं दर्शन
तृतीय नेत्राचा पाझर
अश्रुरूपानं
तेच
जीवाचं गंगास्नान
अनुपम समाधान
ओम् नमः शिवाय ॥