[श्रीमत परमहंस स्वामी स्वरूपानंद (पावस) हे माझे श्रद्धेय. सद्गुरूंच्या आज्ञेनुसार यांच्या समग्र प्रासादिक ग्रंथांचे वाचन झाले. अभंग ज्ञानेश्वरी (नित्यपाठ) नित्य वाचनात होती. शेवट वर-प्रार्थनेनी. ती प्रार्थना वाचताना तसा वर आपल्याला पचवता येईल का असा प्रश्न पडायचा. आपला मूळ पिंड आणि आपल्या लायकीनुसार आपली वर-प्रार्थना कशी असेल हे शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. मूळ रचनेची समश्लोकी. ]
गणाधीशा जगदाधारा| देई मज असे भान|
जगद्व्यापारी वर्तताना| घडो निरंतर सोहम ध्यान ||१||
विषयव्यालांचे इंद्रियांसी| सुखे मिळू देत भोग|
निर्विष पुरा त्यांसी करतो| समर्पण हा च योग ||२||
नाना मत मतांतरे| पंथ संघादी परिग्रही|
तटस्थ ठेवी मम चित्ताला| स्वभावेच अनाग्रही ||३||
मिळो धन मिळो यश| देई आरोग्य संपदा|
सुख शांतीचा संगम| घडो मम गृही सर्वदा ||४||
अति भोग रुग्ण त्याग| नको एकांगी सायास|
समत्व चित्त येण्यासाठी| सारे घडोत प्रयास ||५||
अवघेची हरिरूप| बोध ठसो मम अंतरी|
आत्मौपम्य बुद्धीनेच| मज वर्तू दे जनांतरी ||६|
संकीर्ण कुत्सित मावळो सर्व| उदात्त व्यापक उगवो आता|
व्यवहारार्थ द्वैतभाव| अन्यथा अद्वैतची तत्वता ||७||
दुराग्रही प्रचारकी| कालबाह्य ते सांडिता|
सहज समाधी मज लाभू दे| प्रार्थना ही तुला आता ||८||